राजकीय पुढारी आणि त्यांचे आगळे-वेगळे छंद

– द. वा. आंबुलकर 

राजकीय पुढारी आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती त्यांची तद्दन राजकीय प्रतिमा! त्यांची भाषणे, राजकीय हालचाली इ. मात्र राजकारण्यांच्या या राजकीय जीवनापलीकडे त्यांच्या राजकीय जीवनात या पुढाऱ्यांचे विविध छंद आणि आवडी-निवडी यांच्याशी संबंधित अशा आयामांची फारच थोड्याजणांना कल्पना असते.
उदाहरणार्थ अटलजी त्यांच्या उमेदीच्या व धकाधकीच्या राजकीय व्यग्रतेत पण आपला व आपल्या सहकाऱ्यांसाठी नाश्‍ता बनवीत असत. नरसिंहराव स्पॅनिशसह विविध भारतीय भाषांमध्ये बोलण्याचा सराव करीत तर मुरली मनोहर जोशी भौतिकशास्त्राच्या प्रगतावस्थेवर आजही विचार करीत असतात.

केरळचे माजी मुख्यमंत्री ई. के. नायनार निसर्गोपचाराचा अभ्यास करतात, मुरली देवरा ब्रिज खेळायचे, सोनिया गांधींना जुन्या व दुर्मीळ वस्तूंचा संग्रह करायला आवडते तर लालकृष्ण आडवाणींना बार्बरा कार्टलॅंड आवडते. ऑस्कर फर्नांडिस यांना योगासने करणे आवडते व आपल्या प्रवासात सुद्धा ते वेळात वेळ काढून आपला योगासनांचा नित्यक्रम जारी ठेवतात. भाजपा नेते विजयकुमार मल्होत्रा यांना सुरुवातीपासूनच गणितात रुची होती व आजही पक्षाच्या आर्थिक मुद्यांवर विचार-चर्चा करताना त्यांच्या या गणिती ज्ञानाचा व छंदाचा आजही फायदा होतो. ओमर अब्दुल्ला फावल्या वेळात क्रिकेट खेळण्याची आपली आवड जरूर पूर्ण करतात. भाजपचे विजय गोयल यांना पुरातत्त्व केंद्रांना भेट द्यायला आवडते. आपल्या खासदारकीच्या काळात त्यांनी देशांतर्गत पुरातत्त्व ठिकाणांचे संरक्षण-संवर्धन करण्याचा मुद्दा बराच लावून धरला होता हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.

खासदार मिलिंद देवरा यांनी गिटार वाजविण्याचा आपला छंद आजही जपला आहे. देशाचे अर्थकारण सांभाळणारे चिदंबरम घरी असले म्हणजे संपूर्णपणे घरगुती वातावरणात राहणेच पसंत करतात तर अमरसिंह घरी असले म्हणजे त्यांना हिंदी काव्य-साहित्य वाचणे आवडते. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांचा नेहमीच गृहसजावटीवर कटाक्ष असायचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी कटाक्षाने दररोज व्यायाम-आसने करतात तर प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनजी यांना चित्र काढणे आवडते व वेळ मिळेल त्याप्रमाणे त्या कॅनव्हासवर रंग चितारत असतात. राजकारणातील यादवांच्या छंदांच्या संदर्भात सांगायचे झाल्यास उप्रचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव तरुणपणी कुस्ती खेळत असत. कुस्तीचा आखाडा आणि लालमातीची साथ त्यांनी आजही सोडलेली नसून जमेल तसे ते आखाड्यात तर जातातच शिवाय पक्षाच्या कार्यक्रमाशिवाय इतर उद्‌घाटनांमध्ये त्यांचे प्राधान्य असते ते कुस्तीसह विविध क्रीडा उपक्रमांच्या उद्‌घाटनांना! लालू प्रसाद यादवांना विविध प्रकारचे पदार्थ बनविण्यामध्ये रुची आहे. ही आवड ते घरगुती स्वरूपात तर कायम राखतातच शिवाय पक्ष कार्यकर्ता संमेलनात भोजनगृहात आवर्जून लक्ष घालतात.

थोडक्‍यात म्हणजे आपले राजकारणी- पुढारी त्यांच्या निवडणुकीसह असणाऱ्या धकाधकीच्या राजकारणात सुद्धा संगीतापासून स्वयंपाकापर्यंत तर क्रिकेटपासून कुस्तीपर्यंतचे आपले शौक कायम राखतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)