कोपरगावातील गढूळ पाण्यावर राजकीय ढवळाढवळ

शंकर दुपारगुडे/कोपरगाव: कोपरगाव शहरातील पाणीप्रश्‍न कायमच चर्चेचा विषय झालेला आहे. आता मात्र नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून गढूळ पाणी पाजून सत्तेत असणारे राजकारणी एकमेकांच्या विरोधात अरोप-प्रत्यारोप करीत राजकीय ढवळाढवळ करण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.

पालिकेच्या साठवण तलावत मुबलक पाणी असो अथवा नसो, कोपरगावकरांच्या घशात गढूळ पाणी जाणे नित्याचे झाले आहे. कोपरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ कामाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता कमी होती. पाणीपुरवठा जास्तीचा करावा लागत असल्याने अपेक्षेप्रमाणे शुद्ध पाणी मिळत नव्हते. पालिका प्रशासनाने नव्याने पाणीपुरवठा योजनेची आखणी करून 42 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दीडपट क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र उभारले. मात्र तरीही कोपरगावकरांना गढूळ पाणीपुरवठा होतो. साठवण तलावात पाणी नव्याने आले, तर पाणी ढवळल्याचे कारण सांगत अशुध्द पाणीपुरवठा केला जातो. तर शेवटच्या टप्प्यात साठवण तलावातील पाणी संपत आल्याने गाळमिश्रित पाणी असल्याने कारण पुढे करून गढूळ पाणीपुरवठा केला जातो. ही स्थिती पालिका पाणीपुरवठा विभागाची नित्याची झाली आहे.

जलशुध्दीकरण केंद्राची साठवण क्षमता वाढली आहे. शहरामध्ये नवीन पाईपलाईन टाकलेली आहे. अनेक नवीन पाण्याचे जलकुंभ शहराच्या विविध भागात तयार असूनही आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. यंत्रणा वाढली पण पाणीपुरवठा दिवसाआड झाला नाही. स्वत:ला काही जलतज्ज्ञ समजाणाऱ्यांनी कोपरगावला वाढीव पाणीपुरवठ्याची गरज नाही. मिळणाऱ्या आवर्तनाच्या पाण्यामध्ये दररोज पाणीपुरवठा होईल इतके पाणी मिळते, असे सांगून निळवंडेवरून येणाऱ्या बंद पाईपलाईनच्या पाण्याची कोपरगावला गरज नाही, असे सांगून कोपरगावकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. जर इतके पाणी पालिकेकडे असेल, तर प्रत्येक येणारे सत्ताधिश दररोज पाणीपुरवठा का करू शकले नाहीत? मग हे नेमके पाणी मुरते कोठे? सत्तेत कोणीही आले, तरी पाण्याचे रडगाणे संपले नाही. सत्तेत बसलेल्यांची राजकीय ढवळाढवळ कोपरगावकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करीत आहे.
दरम्यान नगराध्यक्ष विजय वहाडणे सत्तेत येण्यापूर्वी निवडणुकीच्या काळामध्ये दररोज पाणीपुरवठा करणार, बेकायदेशीर नळजोड बंद करणार, शहराच्या विकासाला चालना देणार, मी अपक्ष नगराध्यक्ष असल्याने निवडणुकीपुरते राजकारण करून इतर वेळेस शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करण्याचे अभिवचन देत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले.

सुरवातीचे काही महिने खेळीमेळीच्या वातावरणात गेले आणि हळूहळू राजकारणाच्या चिखलफेकीला सुरवात झाली. विकासाचे मुद्दे बाजूला पडले आणि राजकीय ढवळाढवळ वाढत गेली. नगराध्यक्ष वाहडणे यांनी शहरातील बेकायदेशीर नळजोड तोडण्यासाठी कठोर पावले उचलून शहराच्या पाणी गळतीचा प्रश्‍न कायमस्वरूपी मिटविण्याऐवजी त्याला विविध करणे जोडत चालढकल केली. मात्र गोदावरी डाव्या कालव्यावरील बेकायेदशी पाणी उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवून पाणी चोरीवर आळा घालण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत. मात्र त्याच तळमळीने व धाडसाने शहरातील बेकायदेशिर नळजोड तोडले असते, तर कोपरगावकरांना मुबलक पाणी मिळाले असते.

एका बाजूला गोदावरी डाव्या कालव्यावरील पाणी चोरीने नगरपालिकेच्या साठवण तलावातील पाण्याला कोणताही धक्का लागला नाही, अथवा येसगाव येथील कोपरगाव नगरपालिकेच्या चारही साठवण तलावांतून कोठेच पाणी चोरी होत नसल्याची माहीती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे एका बाजूला देतात, तर दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष वाहडणे हे साठवण तलावाजवळील कालव्यातून बेकायदेशिर पाणी उपसा होत असल्याने साठवण तलावात अपेक्षित पाणी येत नाही, अशी तक्रार करीत आहेत. प्रत्यक्षात तलावातील साठवलेल्या पाण्यावर शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी आहे. त्या पाण्याचे योग्य नियोजन करून योग्य पाणीपुरवठा कसा होईल, यावर लक्ष केंद्रीत करणे अत्यंत गरजेचे आहे. 15 दिवासांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हाल होत आहे.

पाण्याअभावी बाजारपेठ ओस पडली आहे. अशुध्द पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले. पाण्याचा काळाबाजार शहरात वाढला आहे. शुद्ध पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री सुरू आहे. प्रभागातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नगरसेवकांना स्वखर्चाने नागरिकांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली. प्रभाग क्र. दोनमधील नगरसेवक जनार्दन कदम यांनी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या बिकट परीस्थितीत शहरातील पाणी गळती कमी होत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)