ईव्हीएममध्ये छेडछाडीच्या वृत्तामुळे राजकीय खळबळ; प्रणवदांनीही व्यक्‍त केली चिंता

लखनौ/ नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणूकीच्या निकालाला केवळ दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना “ईव्हीएम’मध्ये छेडाछेडी केली गेल्याचे वृत्त पसरल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही या वृत्तावरून चिंता व्यक्‍त केली. निवडणूक आयोगाने या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभुमीवर ‘ईव्हीएम’ सुरक्षित असल्याचे स्पष्टिकरण देऊन संशय दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

आज सकाळपासूनच “ईव्हीएम’मध्ये छेडाछेड झाल्याबाबतचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. “ईव्हीएम’ ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममधील काही संशयास्पद हालचालींचे व्हिडीओदेखील सोशल मिडीयावर व्हायरल झाले. मतदान झालेल्या “ईव्हीएम’शी छेडछाड केल्याचे या व्हिडीओत दिसते आहे. त्यामुळे त्यावर तातडीने विरोधकांच्या प्रतिक्रियाही उमटायला लागल्या. मतमोजणीच्यावेळी “व्हीव्हीपॅट’ मशिनमधील स्लीपांची पडताळणीचे प्रमाण वाढवावे, अशी मागणीही एकदम वाढली. या मागणीसाठी उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये निदर्शनेही झाली.

प्रणवदांनाही चिंता…
“ईव्हीएम’मध्ये छेडछाड होण्याच्या शंकांवरून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही तीव्र चिंता व्यक्‍त केली. निवडणूक आयोगाच्या संस्थागत सार्वभौमत्वाचा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानेच सर्व संभाव्य शक्‍यतांबाबत स्पष्टिकरण द्यायला हवेम्‌ असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

जिल्हा पातळ्यांवर या वृत्तामुळे राजकीय पक्षांकडून “ईव्हीएम’च्या सुरक्षिततेबाबत विशेष सतर्कता घेतली जायला लागली. राजकीय पक्षांनी आपापल्या कार्यकर्त्यांना, उमेदवारांना आणि पदाधिकाऱ्यांना “ईव्हीएम’ मधील छेडछाडीबाबत जागरुक राहण्याच्या सूचना दिल्या.

उत्तर प्रदेशातील मुख्य निवडणुक अधिकरी वेंकटेश्‍वरलू यांनीही “ईव्हीएम’मध्ये छेडछाड झाल्याची भीती फेटाळून लावली आहे. सर्व स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटिव्ही कॅमेरे आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधींना या स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवण्याची परवानगी आहे. त्यामुळे या संदर्भातील सर्व भीती अनाठायी आहेत, असे ते म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)