राजकीय धुलवडीने सोशल मीडिया रंगली!

– रोहन मुजूमदार

लोकसभा 2014च्या निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून जवळपास सर्वच पक्षांना भुईसपाट केले होते. याचा धडा घेत सर्वच पक्ष सोशल मीडियावर सक्रिय झाले आहे. त्यामुळे या 2019च्या निवडणुकीसाठी 2014नंतर लगेचच सर्वच पक्षांनी सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. या रणसंग्रामात “हायटेक’ प्रचार तंत्राचा सर्वच पक्षांकडून मुक्‍त हस्ते प्रचार सुरू असला तरी या सोशल प्रचारावर निवडणूक आयोगाची करडी नजर असल्याने जो-तो सावध पवित्रा घेऊनच एखादी राजकीय पोस्ट व्हायरल करीत आहे. या सोशल वॉररुममधील कार्यकर्ते नेत्यांच्या इमेज बिल्डिंगची कसरत कसोशीने करत असल्यामुळे सध्यातरी राजकीय पोस्ट, कार्टून, नेत्यांचे विविध अंगी-ढंगी छायचित्रे, उमेदवार-इच्छुकाने केले काम, आरोप-प्रत्यारोप, पोस्टार, बॅनरबाजी आदी राजकीय धुलवडीने सोशल मीडिया सध्यातरी रंगली आहे.

स्वातंत्र्यानंतर जवळपास चार दशके देशातील निवडणुकांमध्ये प्रचारासाठी बैलगाड्या, ट्रक, रिक्षा आणि मोठमोठे भोंगे घेऊन घोषणा देत कार्यकर्ते प्रचार करत. भिंती रंगविल्या जात. ताई माई अक्‍का, ..वर मारा शिक्का’ अशा घोषणा देत कार्यकर्ते पत्रके वाटत दारोदार फिरत. आंतरदेशीय कार्ड तसेच पोस्ट कार्डचा प्रचारासाठी तेव्हा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. खेड्यापाड्यात जीपगाड्या धुरळा उडवीत मोठ्या दिमाखात फिरायच्या तेव्हा गावागावातील मुले या गाड्यांच्या मागे घोषणा देत धावताना दिसायची. मात्र, आता चित्र बदलले आहे. एका “क्‍लिक’वर प्रचार फिरू लागला आहे. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून देशातील कोणताही नेता अथवा पक्ष आपले म्हणणे मांडू लागला आहे. सर्वच पक्षांनी हायटेक प्रचारासाठी आपापल्या टीम स्थापन केल्या असून या टीम फक्‍त निवडणुकीपुरत्या नाही तर दररोज कार्यरत आहेत.

विविध पक्षांच्या प्रचाराच्या प्रत्येक तंत्रासाठी बड्या कंपन्या उभ्या राहिला आहेत. घोषणा, पक्षाचे धोरण, आकर्षक जाहीरनामा तयार करण्यापासून एसएमएस, मोबाइल, ऍप्स, गुगल, फेसबुक, इंटरनेटच्या प्रत्येक अंगाचा प्रभावी वापर नेत्याची प्रतिमा विकसित करण्यापासून पक्षाला लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करू लागले. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांचे ताफेच्या ताफे विविध पक्षांनी बाळगले असून हे पेड कार्यकर्ते पक्षासाठी अहोरात्र काम करून पक्ष व नेत्याला जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे. चणे-फुटाणे, वडापाव आणि कटिंग चहाच्या जागी हायटेक प्रचार करणाऱ्यांसाठी बर्गर-पिझ्झा आणि थंडपेयाच्या बाटल्यांचा साठा विविध पक्ष कार्यालयांत पाहावयास मिळत आहे. नेत्याचा ड्रेस, त्याचे दिसणे हे सारेच प्रचारासाठी नियुक्‍त केलेल्या कंपन्यांचे लोक पाहू लागल्यामुळे प्रत्यक्षाहून प्रतिमा “सुंदर’ अशी साऱ्याच नेत्यांची सध्याची स्थिती आहे.

“टीकटॉक’ ठरणार प्रभावी!
सोशल मीडियावरील टीकटॉक हे ऍप सध्या सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. या ऍपद्वारे समोर कोणाचाही चेहरा आणि त्या मागे एखादे गाणे, विविध डायलॉग आदी 15 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल करून समोरच्याचे मनोरंजन करण्यात येत आहे. याच अस्त्राचा राजकीय कार्यकर्त्यांकडून मोठ्याप्रमाणात फायदा उठवून मतदारांच्या चेहऱ्यावर हस्य निर्माण करून विरोधकांवर खोचक टीका करण्यासाठी क्‍लिप व्हायरल होण्याची शक्‍यता आयटी तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)