नगरसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
नगर: पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करून त्यास लाकडी दांडके, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक त्रिंबके यांच्यासह अमित गाडे, प्रताप गायकवाड व इतर चार ते पाच अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत पोलीस कर्मचारी पांडुरंग ज्ञानदेव म्हस्के (रा. संचारनगर, पाईपलाईन रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी रात्री दहा वाजता काहीजणांचे टोळके म्हस्के यांच्या घरी गेले. “तू आमच्या विरोधात केस का केली,’ असे म्हणून बळजबरीने त्यांना दुचाकीवर बसविले व तेथून नगरसेवक सुनील त्रिंबके यांच्या श्रीराम चौकातील ऑफिसवर घेऊन गेले. तेथे गेल्यानंतर शिवीगाळ दमदाटी करून म्हस्के यांना लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली.
मारहाणीत पांडुरंग म्हस्के हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग मस्के यांच्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात नगरसेवक सुनील त्रिंबके, अमित गाडे व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांना मारहाणीच्या दोन घटना घडल्या असून, यात पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके हे दीपक पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की करण्यात आली होती.
दुसऱ्या घटनेत पाईपलाईन रस्त्यावर पोलिसाला मारहाण झाली, तर तिसरी घटना ही एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव माळवी येथे घडली होती. यामध्ये पोलिसाला तलवारीच्या साह्याने मारहाण करण्यात आली होती. यातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याचे दिसत आहे. आता ह्या घटना ताज्या असतानाच पोलीस कर्मचारी पांडुरंग म्हस्के यांना मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसांदिवस पोलीस प्रशासनामधील धाक कमी होत चालला आहे. पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाच मारहाण होत असल्याने सर्वसान्य नागरिक सुरक्षित कसे असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.