दरबारातच केल्या पोलिसांच्या बदल्या

600 कर्मचाऱ्यांना चॉईस पोस्टिंग : बदली प्रक्रियेत राबवले पारदर्शक धोरण

पिंपरी  – पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेनंतर कर्मचाऱ्यांची नाराजी, त्यानंतर बदली प्रक्रियेवर उपस्थित होणारे प्रश्‍न या सर्व बाबींना फाटा देत पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्‍त आर.के.पद्यनाभन यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यात पारदर्शक धोरण राबविले. कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना थेट कर्मचाऱ्यांचा दरबाराचेच आयोजन करून या दरबारातच पात्र कर्मचाऱ्यांना संबंधित पोलीस ठाण्यात नियुक्‍ती देण्यात आली. त्यामुळे पोलीस आयुक्‍तांनी राबवलेल्या या पारदर्शक पद्धतीचे कर्मचाऱ्यांनी स्वागत केल्याचे दिसून आले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालय कार्यालयातंर्गत नव्याने स्थापन झालेल्या पोलीस चौकी आणि पोलीस ठाण्यातील शेकडो पदे रिक्‍त आहेत. त्या जागेवर आपली बदली व्हावी, याकरिता खात्यातंर्गत पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय आणि विनंती अर्ज केले होते. त्यानुसार तब्बल सहाशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचे अर्ज पोलीस आयुक्‍तालयात प्राप्त झाले होते. त्यामुळे, ही बदली प्रक्रिया राबवण्यात आली. पोलिस आयुक्‍त आर. के. पद्यनाभन यांनी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत अर्ज मागवून त्यांना आज मंगळवार दि. 18 जून रोजी एकत्रित बोलविले. बदलीच्या अर्जासोबत नियुक्तीविषयी इच्छुक स्थळ ही मागवण्यात आले होते. सर्वांना पोलीस ठाणे व चौकीतील रिक्‍त पदे, त्यांच्या आवश्‍यकतेनुसार बदलीचे धोरण स्वीकारले असून ज्या कर्मचाऱ्यांना एकाच ठाण्यात तीन वर्षे झालेले आहेत अशांची बदली करण्यात आली.

तसेच बदलीची कारणेही विचारून सर्वांसमक्ष बदल्या करण्यात आल्या. आज दोन तासातच आयुक्तांनी 600 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे, बदली झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. 15 पोलीस ठाण्याचे तीन-तीन विभागांमध्ये विभाजन करून पाच पथके तयार करण्यात आली आहेत. ज्यामध्ये भोसरी, पिंपरी, चाकण, वाकड आणि देहुरोड या पाच विभागांचा समावेश आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या विभागात नव्या कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यक्षमता दाखवण्याची संधी मिळणार आहे.

शंकेला स्थान नाही
पोलीस कर्मचाऱ्यांच्या दरवर्षी होणाऱ्या बदली प्रक्रियेवर अनेक वेळा प्रश्‍न उपस्थित केला जातो. अनेक कर्मचारी बदली प्रक्रियेनंतर वरिष्ठांना मॅनेज करायला हवे होते. सेटिंग करायला हवे होते. अशी वक्‍तव्ये खाजगीमध्ये करतात. मात्र अशा सर्व प्रकारच्या शक्‍यतांना फाटा देत आयुक्‍तांनी थेट दरबार भरवून बदली प्रक्रिया राबवली. बदली विषयी कोणतीच तिळमात्र शंका राहणार नाही, याची काळजी घेतली. पोलीस ठाण्यातील उपलब्ध जागा, तेथील नियम व अटी पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच बदली करण्यात आली आहे.

ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांचीही बदली
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीमधील काही पोलीस ठाण्यामध्ये अनेक कर्मचारी वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले होते. ठाण्याचे अनेक अधिकारी बदलले तरीही या कर्मचाऱ्यांची बदली झालेली नव्हती. आजच्या दरबारात अशा ठाण मांडून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या “संस्थानावर’ही गंडांतर आले आहे. त्यांची बदलीही या प्रक्रियेत होणार असल्याने या कर्मचाऱ्यांनाही आपले स्थान सोडावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)