राजकीय नेत्यांना पोलिसांकडून अभय?

दोन गुन्ह्यानंतरही बांदल माध्यमांपुढे : पोलिसांच्या लेखी मात्र आरोपी फरार

पुणे – शिरूर तालुक्‍यातील शिरूर व मलठण येथील अपंग व शेतकरी यांची जमीन व्यवहारांत फसवणूक करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर दोन गुन्हे दाखल होऊनही अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही? याबाबत उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. दाखल गुन्ह्यांमध्ये बांदल यांनी जामीन घेतला किंवा कसे? याबाबत ठोस माहिती पोलीस अधिकारी देत नाहीत.

आजच अनेक पत्रकार, यूट्यूब चॅनल यांच्यावर मंगलदास बांदल यांनी आपली बाजू मांडलेली दिसली. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेबद्दल शिरूर तालुक्‍यात संशयाची सुई निर्माण झाली असल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने बांदल व त्यांचे सहकारी यांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना झाल्याची बोलले जात होते; परंतु या प्रकरणातील आरोपी खुलेआम पोलिसांना चॅलेंज देऊन माझा या प्रकरणाची कुठलाही संबंध नसल्याचे पत्रकारांना सांगत आहे. पोलिसांच्या लेखी आरोपी फरार असेल तर पत्रकारांच्या संपर्कात कसा काय? फरार आरोपी पत्रकारांसमोर बोलत असेल, व्हिडिओद्वारे आपली प्रतिक्रिया देत असेल तर शिरूर आणि शिक्रापूर पोलिसांची पथके नक्की कुठे गेली? हे कळत नाही.

जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वातील पोलीस खात्याकडून राजकीय आरोपींना अभय दिले जात असेल तर याच्या पाठीमागे कोण आहे? हे प्रश्‍न पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पडले आहेत.

या दोन्ही गुन्ह्यातील फरार मंगलदास बांदल यांना अटक होऊ नये म्हणून पोलिसांवर राजकीय दबाव आहे का? राजकीय दबावापोटी शिक्रापूर व शिरूर पोलीस मंगलदास बांदल यांना अटक करत नाही का किंवा या दोन्ही प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे का? असे अनेक प्रश्‍न शिरूर तालुक्‍यातील व पुणे जिल्ह्यातील नागरिकांना पडेले आहेत. गुन्हा दाखल असलेल्या एखाद्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करायची असेल तर पोलीस त्यांच्या घरावर 10 ते 15 वेळा जातात. अनेक वेळा मानसिक त्रास दिला जातो, त्यांच्या नातेवाईकांना पोलीस ठाण्यामध्ये बसवले जाते; परंतु मंगलदास बांदल यांच्यासारख्या राजकीय नेत्यास अभय दिले जाते.

दरम्यान, बांदल यांच्यावरील गुन्ह्यांमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरूर तालुका चर्चेत आला आहे.

मंगलदास बांदल यांच्या विरोधात शिरूर तालुक्‍यातील दोन्ही पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्यासंदर्भात गुन्ह्यातील पुरावे आम्ही कोर्टात दाखल करणार आहोत. त्यांना अटक करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रयत्नशील आहेत. तपासात काय खरे, काय खोटे निष्पन्न होणारच आहे.
– सचिन बारी, पोलीस उपअधीक्षक दौंड उपविभाग


आरोपी कोणीही असू देत, कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात येईल.
– सदाशिव शेलार,पोलीस निरीक्षक, शिक्रापूर.


मंगलदास बांदल यांचा जामीन अर्ज मंजूर झालेला नसून त्यांना कुठल्या क्षणी अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
– नारायण सारंगकर, पोलीस निरीक्षक शिरूर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)