पोलीस चकमकीत संशयित दरोडेखोर ठार

सोलापूर – सोलापुरमध्ये शनिवारी मध्यरात्री पोलीस आणि दरोडेखोर यांच्या झालेल्या चकमकीत एक दरोडेखोर ठार झाला आहे. हा प्रकार सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ घडला. मात्र त्याचसोबत तीन पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी बनाव रचून हत्या केल्याचा आरोप मृत विनायक काळेच्या नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना उळे गावाजवळ पाच ते सहा दरोडेखोर दिसले. पोलिसांनी त्यांना हटकले आणि एकाला पकडून गाडीत बसवत असताना त्याने आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी तलवारीने पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या हातावर आणि मांडीवर तलवारीने वार केला.

या हल्ल्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस निरीक्षक पाटील यांनी दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये एक दरोडेखोर जखमी झाला, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, मयत विनायक काळे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी त्याचा थेट एन्काऊंटर केला. एका प्रकरणात पोलीस विनायककडे पैशाची मागणी करत होते, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विनायकच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचाही आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

मयत विनायक हा बारावी पास होता. पोलीस दलात भरती होण्यासाठी विनायक रोज सराव करत होता. विनायकची एक बहीण इंजिनिअर, तर एक पदवीधर असून एमपीएससीची तयारी करत आहे. विनायकच्या अचानक मृत्यूने त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे.

…तर दोषींवर कारवाई
मध्यरात्री उळे येथे झालेल्या पोलीस आणि दरोडेखोरांच्या चकमकीत ठार झालेला विनायक काळे याच्या नातेवाईकांनी दुपारी पोलीस आधीक्षक कार्यालयात गोंधळ घातला. यानंतर घटनेचे गांभीर्य ओळखुन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काळे यांच्या नातेवाईकसोबत बैठक घेतली. जर काळे याच्यावर अन्याय झाला असेल तर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशीही करण्यात येईल, असे त्यांनी संयुक्तरित्या सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)