कोरेगाव भीमा, सणसवाडीत पोलीस व सीआरपीएफची तुकडी तैनात

शिक्रापूर – लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी राज्यात संवेदनशील असलेल्या कोरेगाव भीमा, मतदान केंद्रावर निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यासह सीआरपीएफची तुकडी बंदोबस्तासाठी नेमण्यात आली आहे. नुकतेच पोलिसांसह सीआरपीएफच्या तुकडीने कोरेगाव सणसवाडीत देखील संचलनही केले.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे दि. 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. त्याचे पडसाद राज्यभरात उमटल्यामुळे व सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघात असलेल्या या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यावेळी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून कोरेगाव भीमा येथील मतदान केंद्र हे संवेदनशील मतदान केंद्रामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर सीसीटिव्ही व व्हिडीओ चित्रिकरणही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने घोषित केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी येथे एक स्वतंत्र पोलीस अधिकारी तसेच जम्मू काश्‍मीर येथील सीआरपीएफच्या जवानांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 35 गावांतील 115 बुथवर सात पोलीस अधिकाऱ्यांसह 75 होमगार्ड व 200 पोलिसांसह पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. संवेदनशील कोरेगाव तसेच कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथे पोलीस संचलनही करण्यात आले. पेट्रोलिंगही सुरू आहे.

दरम्यान, बुथवर कोणालाही मोबाइल व तत्सम डिव्हाईस नेता येणार नसल्याचे शिक्रापरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)