कविता : अनुयायांनी उगाच भुंकू नये

लुकलुकणाऱ्या काजव्यांनी
तेजस्वी सूर्यावर थुंकू नये
नेत्यांच्या सुपाऱ्या घेऊन
अनुयायांनी उगाच भुंकू नये

देशहितासाठी तरी नेत्यांनी
काही मुद्यांवर मौन धरावे
संरक्षणाचा विषय गंभीर आहे
इतर विषयांवर राजकारण करावे

राजकीय टिकाटिप्पणी करताना
राजकारण्यांनी ठेवावे भान
बेफाम बेलगाम वक्तव्यांमुळेच
आपल्या देशाची खाली जाते मान

पंतप्रधान एका पक्षाचा नसतो
राजकारण्यांनी लक्षात घ्यावे
चारित्र्य-चरित्र असणाऱ्यांनाच
नेत्यांनी आपल्या पक्षात घ्यावे

आपल्या परंपरा आदर्श, महान
मात्र नेत्यांना सत्तेचीच तहान
नावाजलेली राजकीय घराणी
प्रत्यक्षाहून आहेत अति लहान

निवडणुका झाल्यानंतर नेत्यांना
पाच वर्षे तरी काम करू द्या
राजकारणामुळेच अडथळे
काही काळ तरी संघर्ष सरू द्या

विकासकामांची स्पर्धा व्हावी
एकमेकांचे पाय ओढणे नको
बेपर्वा बेभान बेलगाम पुढाऱ्यांचे
समाजाच्या गळ्यात लोढणे नको

नव्या पिढीपुढे आदर्श असावा
म्हणून तरी नेत्यांनो निट वागा
निवडणुकांतील संघर्ष संपवून
विकासकामांच्या मागे लागा

फक्त राजकारण करणाऱ्यांनो
समाजकारण करणेही शिका
विरोधकांनी विकास केला तरी
उगाचच करू नये व्यर्थ टीका

समाज प्रतिक्रिया देत नाही
पण परीक्षण करतो आपले
मात्र एकमेकांत चर्चा करतात
या नेत्याने किती खिसे कापले

– विजय वहाडणे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)