विविधा : कवी ग्रेस

-माधव विद्वांस

पत्रकार, लेखक, संपादक व नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवी ग्रेस यांचे आज पुण्यस्मरण (निधन 26 मार्च, 2012) त्यांचे पूर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे. त्यांचा जन्म 10 मे 1937 रोजी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील लष्करात होते. त्यांचे लहानपण खडतर होते, कारण त्यांच्या आईचे अकाली निधनाने त्यांच्यावर नोकरी, शिक्षण व घर अशी तिहेरी जबाबदारी पडली होती.

जन्मतः साहित्यिक व अभ्यासू असल्याने त्यांनी एम.ए.मध्ये सुवर्णपदक मिळवले होते, त्यावेळी त्यांना अपघात झाला होता. प्लॅस्टरमधील हातानेच त्यांनी पारितोषिक स्वीकारले होते. त्यांनी त्यांची आई गेली तेव्हा “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ ही कविता लिहिली. वर्ष 1958 पासून गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कवी ‘ग्रेस’ या नावातही एक गोष्ट आहे, ते ‘दी इन ऑफ द सिक्‍स्थ हॅपिनेस’ या बोलपटात काम करणाऱ्या इन्ग्रिड बर्गमन’ अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित झाले. त्या चित्रपटात इन्ग्रिडसंबंधी “शी इज इन ग्रेस’ असे वाक्‍य येते. त्यावेळी ती आपल्याला जणू शीळ घालत आहे, असे त्यांना वाटले. तेव्हापासून त्यांनी “ग्रेस’ हे नाव धारण केले. हे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ या मुखपत्राचे वर्ष 1971 ते 1974 या काळात ते संपादक होते. वर्ष 1982 ते 1986 या काळात महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे ते सदस्य होते. वर्ष 1975 मध्ये रामदास भटकळ यांचे ‘रायटर्स सेंटर मुंबई’ या संस्थेच्या ‘संदर्भ’ या द्वैमासिकाचे संपादन करीत असत. या द्वैमासिकात दिग्गज लेखकांनी लिहिलेल्या लेखांचे संपादन केलं होते.

त्यांनी वर्ष 1966 ते 1968 या कालावधीमध्ये नागपूरच्या ‘धनवटे नॅशनल कॉलेज’मध्ये अधिव्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर वर्ष 1968 पासून ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेच्या ‘मॉरिस कॉलेज’मध्ये मराठीचे अध्यापन करीत होते. वर्ष 1997 मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

निवृत्तीनंतर वर्ष 2004पर्यंत नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात संशोधन मार्गदर्शक व ‘सौंदर्यशास्त्र’ या विषयाचे अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे वर्ष 1971 ते 1976 या काळात ते सदस्य होते. “वाऱ्याने हलते रान’ या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना 2012 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला.

त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहातील अर्पणपत्रिकेतील काही ओळी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये छापत असत. त्यांची सुमारे नऊ गीते स्वरबद्ध झाली आहेत. “ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ ही कविता हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वतः संगीतबद्ध करून गायली आहे. तसेच “तुला पाहिले मी नदीच्या किनारी’ ही कविता श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध करून ती त्यांनी व सुरेश वाडकर यांनी गायली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)