“पीएमआरडीए’ हद्दीतही इमारत उंचीचे प्रमाणपत्र बंधनकारक

सुरक्षेच्या कारणास्तव सर्व्हे ऑफ इंडियाची “एनओसी’ आवश्‍यक

नागरी हवाई वाहतूक व संरक्षण विभागाचे आदेश

पुणे – आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत (पीएमआरडीए) विशिष्ट उंचीपर्यंतच्या बांधकामांसाठी सर्व्हे ऑफ इंडियाचे “ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) घ्यावे लागणार आहे. लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) प्रशिक्षण देण्यासाठी विमानतळ उभारले जात आहे. सुरक्षेचे कारण देऊन नागरी हवाई वाहतूक विभाग व संरक्षण विभागाने ही अट ठेवली आहे. जर ठराविक उंचीपेक्षा जास्त उंची असल्यास अशा बांधकामांना नागरी हवाई वाहतूक विभागाची “एनओसी’ घ्यावी लागणार आहे.

केंद्र शासनाच्या नागरी हवाई वाहतूक विभागाच्या अधिसूचनेनुसार लोहगाव विमानतळ व “एनडीए’ विमानतळापासून काही अंतरामध्ये इमारतीच्या उंचीवर बंधने आणलेली आहेत. त्यानुसार विमानतळापासूनच्या विमानतळ व त्यापरिसरातील जागांचे झोन तयार करण्यात आले आहे. हे “कलर कोड झोन’ प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

या नकाशानुसार कलर कोडिंगनुसार येणाऱ्या गावांमधील बांधकाम परवानगी प्रकरणामध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची परवानगी घ्यावी लागणार आहे. “रेड झोन’मध्ये येणाऱ्या गावांमधील बांधकाम परवानगी प्रकरणामध्ये नागरी हवाई वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्यानंतरच विकास परवानगी प्रकरणाची छाननी करण्यात येणार आहे. ब्लू, पिंक, येलो आणि ग्रीन झोनमधील विकास परवानगी प्रकरणाबाबत जमिनीची व इमारतीची उंची याची समुद्रसपाटीपासूनची उंची सर्व्हे ऑफ इंडियाकडून घेऊन बांधकाम नकाशावर दर्शविण्यात यावी. प्रत्येक झोनमध्ये ठरवून दिलेल्या उंचीपेक्षा जास्त असल्यास त्या प्रकरणामध्ये नागरी हवाई वाहतूक विभागाची “एनओसी’ प्राप्त झाल्यानंतर बांधकाम परवानगी प्रकरणाची छाननी केली जाणार आहे.

संरक्षण विभागाने लोहगाव विमानतळ आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील (एनडीए) विमानतळापासून ठराविक उंचीपर्यंतच्या बांधकामांसाठी समुद्रसपाटीपासून उंची मोजणीचे प्रमाणपत्र सर्व्हे ऑफ इंडियाकडून घेणे बंधनकारक केले आहे. यासाठी संरक्षण विभागाने कोणत्या कायद्याखाली अधिसूचना काढली आहे, याबाबतची माहिती संरक्षण विभागाकडून मागविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य शासनाकडून यासाठीचा अभिप्राय घेतला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

रेड झोन- या झोनमध्ये सर्व इमारतीच्या उंचीबाबत नागरी विमान मंत्रालय विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक.
ब्लू झोन – इमारत उंची समुद्रसपाटीपासून 627 मी किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर प्रमाणपत्र आवश्‍यक नाही
पिंक झोन- इमारत उंची समुद्रसपाटीपासून 637 मी किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर प्रमाणपत्र आवश्‍यक नाही.
येलो झोन- इमारत उंची समुद्रसपाटीपासून 712 मी किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर प्रमाणपत्र आवश्‍यक नाही.
ग्रीन झोन – या झोनमध्ये इमारतीची उंची समुद्रसपाटीपासून 742 मी किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर प्रमाणपत्र आवश्‍यक नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)