पीएमपीएमएल जाहिरात निविदेत घोटाळा

नगरसेवक प्रशांत जगताप यांचा आरोप : दरमहा होतेय 90 लाख रुपयांचे नुकसान

पुणे – “पीएमपीएमएल’ने काही दिवसांपूर्वी तीन वर्षांसाठी “एसकेपीएल’ कंपनीला दिलेले जाहिरातीचे काम हे बेकायदेशीर असून यामध्ये पुणेकरांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान आहे. या निविदाप्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केला आहे. तसेच ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही त्यांनी “पीएमपीएमएल’च्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्याकडे केली आहे.

ज्या “एसकेपीएल’ कंपनीला काम देण्यात आले आहे, त्यांच्याबरोबर पीएमपीएमएलचे जुने वाद आहेत. तसेच पीएमपीएमएलच्या जुन्या जाहिरातीबाबत न्यायालयात “आरबिट्रेशन’ सुरू आहे. असे असतानाही या कंपनीला निविदा प्रक्रियेत कसा समावेश करण्यात आला, असा प्रश्‍न जगताप यांनी उपस्थित केला आहे.

या निविदा प्रक्रियेत पीएमपीएमएलचा “बेस रेट’ कमीतकमी एक कोटी सहा लाख रुपये होता. बीव्हीजी कंपनीने एक कोटी 10 लाख रुपये द्यायची तयारी दाखवली होती. “एसकेपीएल’ यांनी 52 लाख रुपये द्यायची तयारी दाखवली. “बेस रेट’पेक्षा कमी असतानासुद्धा या कंपनीला कसा काय ठेका देण्यात आला, असाही प्रश्‍न जगताप यांनी उपस्थित केला आहे. यामुळे महिन्याला सुमारे 90 लाख रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा जगताप यांनी केला आहे.

या निविदा सात वेगवेगळ्या भागांत काढण्यात आले होते. त्यातील दोन भागात “एसकेपीएल’ हे हायरल आले आणि अन्य निविदेमध्ये ते कमी आले, असे असतानाही त्यांना बाद करण्यात का आले नाही, याचा खुलासाही जगताप यांनी गुंडे यांच्याकडे मागितला आहे.

या निविदा प्रक्रियेसाठी पाच ते सहा वेळा वृत्तपत्रात जाहिरात देऊनही हवा तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आधीच 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, त्याला जबाबदार कोण? असा सवाल जगताप यांनी विचारला आहे. या सर्व प्रश्‍नांचा खुलासा येत्या सात दिवसांत करावा. तसेच झालेली निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने प्रक्रिया करावी, अशी मागणी जगताप यांनी गुंडे यांच्याकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)