रिक्षांच्या अतिक्रमणांमुळे पीएमपीचे प्रवासी धोक्‍यात

बसथांब्यांवर अतिक्रमण ः चौकाचौकात वाहतूक नियमांची पायमल्ली

चिखली – अधिकृत थांबे सोडून पीएमपीएमएलचे बस थांबे रिक्षांनी बळकावले आहेत. त्यामुळे जीव धोक्‍यात घालून प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करावा लागत आहे. मात्र, वाहतूक पोलीस गांधारीच्या भूमिकेत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

रिक्षांसाठी शहरात अधिकृत थांबे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मात्र, प्रवासी रिक्षांमध्ये कोंबण्याच्या स्पर्धेत अधिकृत थांबे सोडून रिक्षावाले सार्वजनिक बस स्थानकांसमोर थांबतात. पीएमपीएमएलच्या बस थांब्यांना रिक्षांच्या अतिक्रमणांचा सर्वाधिक फटका बसत आहे. रिक्षांच्या अतिक्रमणांमधून वाट काढत बस पकडताना नागरिकांना अक्षरशः कसरत करावी लागले. बऱ्याचदा बस निघून जाते. त्यामुळे पुन्हा ताटकळत थांबण्याची वेळ येते. हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस उभे असूनही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. अशा रिक्षांवर कारवाई करण्याऐवजी सिग्नलला आयतेच थांबलेल्या प्रवाशांना पकडण्यात पोलीस व्यस्त असतात.

पिंपरी चौकात पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या पीएमपीएमएल बससाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. प्रवाशांना भरून अवैध प्रवासी वाहतूक नित्याची बाब झाली आहे. हा धोकादायक प्रवास जीव मुठीत घेवून शहरात सर्वत्र सुरू आहे. वाहतूक पोलीस उभे असताना देखील मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. वाहतूक विस्कळीत झाली तरी चौकातील वाहतूक पोलीस कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. रिक्षा चालकांची मुजोरी एवढी वाढली आहे की, त्यांना ट्राफिक पोलिसांचा धाक राहिलेला नाही. कोणत्याही चौकात आडवी-तिडवी रिक्षा उभ्या केल्या जातात. प्रवाशांना रिक्षात बसविण्यासाठी स्पर्धा सुरू असते. अशा परिस्थितीत पुढून-मागून येणारे वाहन, पादचारी या कोणाकडेही रिक्षा चालकाचे लक्ष नसते. नागरिकांनी याबाबत जाब विचारल्यास दमबाजी केली जाते. सर्व रिक्षावाले तक्रारदाराच्या विरोधात एकवटतात. वाहतूक पोलीस कारवाईकडे कानाडोळा करीत असल्याने कोणाकडे दाद मागावी, असा सवाल उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)