पीएमपीचा खोळंबा; प्रवासी रस्त्यावर

“सीएनजी’ संपल्याचे दिले कारण : प्रवाशांमध्ये नाराजी 
 
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाला उद्‌भवणाऱ्या अनेक समस्यांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. बसेस रस्त्यात बंद पडणे (ब्रेकडाऊन), बसेसची दुरवस्था, धुरामुळे होणारे प्रदूषण आदी समस्यांबाबत प्रवासी नाराजी व्यक्‍त करतात. पण सध्या यामध्ये “सीएनजी’ बसेसची भर पडली आहे. दि. 17 रोजी भर रस्त्यामध्ये “सीएनजी’ बस बंद पडल्याने प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.

ब्रेक फेल आहेत, इंजिनमध्ये बिघाड आहे, क्‍लच फेल आहे आदी कारणांमुळे दरदिवशी सुमारे 60 ते 80 बसेसमधून प्रवाशांना भररस्त्यात उतरविले जाते. मात्र, आता यामध्ये “सीएनजी संपला, बस पुढे जाणार नाही’ या वाक्‍याची भर पडली आहे. या प्रकाराला पीएमपीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा जबाबदार असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.

पीएमपीच्या नियमांनुसार, डेपोतून बस बाहेर पडण्यापूर्वी “सीएनजी’ भरला जातो. सकाळी पहिल्या फेरीसाठी बस ताब्यात घेताना चालकाने बसमध्ये सीएनजी असल्याची खात्री करुन घेणे आवश्‍यक आहे. मात्र, असे होताना दिसून येत नाही.
सकाळी सव्वासहाच्या सुमारास शिवनगर (सुतारवाडी) ते डेक्‍कन या मार्गावर धावणारी बस अचानक बंद पडली. “गॅस भरायचा आहे, प्रवाशांनी खाली उतरा’ असे सांगत प्रवाशांना “म्हसोबा गेट’ येथे खाली उतरविण्यात आले. या मार्गावरील बसमधून गॅस भरण्यासाठी जायचे आहे, असे सांगून प्रवाशांना वारंवार उतरविले जाते, असे प्रवाशांनी सांगितले.

प्रशासकीय नियमावलीनुसार सकाळी डेपोतून निघताना चालकाने गॅस पाहणे आवश्‍यक आहे. मात्र, घडलेल्या प्रकारातून नियमांकडे चालकांचे दुर्लक्ष होत आहे, असे म्हणावे लागेल. चालकांच्या अशा कारभारामुळे प्रवाशांची गैरसोय होते. प्रशासनाकडून देखील याची गंभीर दखल घेतली जात नाही. प्रशासनाने संबंधित चालक आणि वाहकांवर कारवाई करावी.


– आशा शिंदे, सदस्या, पीएमपी प्रवासी मंच

सकाळी पहिल्या फेरीमध्ये बसचा सीएनजी संपणे आणि प्रवाशांना उतरविणे योग्य नाही. त्यामुळे संबंधित बसच्या वाहक आणि चालकाची आम्ही चौकशी केली आहे. या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात येत असून पीएमपी प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

– अजय चारठाणकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here