“पीएमओ’ उत्तर देते; तुम्हाला अडचण काय?

नवीन विविध अभ्यासक्रमांना विद्यापीठाची मान्यता

विद्यापीठ प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्‍नांची सरबत्ती: अधिसभेत सदस्य आक्रमक

स्वतंत्र कक्ष स्थापन करणार : कुलसचिव

अधिसभा सदस्यांच्या पत्रव्यवहारास वेळेत उत्तर देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, संबंधित विभागाकडून पत्रास उत्तर देण्यास उशीर होत असतो. त्या पार्श्‍वभूमीवर सदस्यांच्या कोणत्याही प्रश्‍नास वेळेत उत्तर मिळण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येईल. त्याद्वारे सदस्यांना तातडीने प्रश्‍नांचे उत्तर देण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली.

पुणे – पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) पत्रव्यवहार केल्यास त्याचे उत्तर 24 तासांत मिळते. मात्र, विद्यापीठाच्या प्रशासनाकडून आमच्या पत्रास उत्तरही दिले जात नाही. अपेक्षित उत्तरासाठी सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागते, अशी व्यथा मांडत अधिसभा सदस्यांनी शनिवारी विद्यापीठ प्रशासनास जाब विचारला. अधिसभेत सदस्यांचा आक्रमक पवित्रा पाहता सदस्यांच्या पत्रव्यवहारास त्वरित माहिती उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी यावेळी केली.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्रारंभी अधिसभेत अहवाल सादर केला. वर्षभरात झालेल्या कार्याचा आढावा घेत आगामी काळात सुरू करण्यात विविध योजना, अभ्यासक्रमांचे सुतोवाच केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून “एम.एसस्सी. प्रोग्राम इन अर्बन वॉटर ऍन्ड सॅनिटेशन, बीएसस्सी ब्लेडेंड, एम.एसस्सी. ऍस्ट्रोफिजिक्‍स, बीए इन लिबरल आर्टस, एम.एस्सी. ऍस्ट्रोबायोलॉजी, मॉस्टर्स कोर्स इन डिझाईन’ या नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, कुलगुरूंच्या अहवालानंतर सदस्यांनी मागील अधिसभेत मांडल्या गेलेल्या ठरावावर काय कार्यवाही झाली, असा प्रश्‍न उपस्थित केला. “ठरावानंतर नोंद करून घेतली आहे, संबंधित विभागाकडे ठराव पाठविण्यात आला,’ या जुजबी उत्तरावरून सदस्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

अधिसभा सदस्य राजीव साबडे यांनी आपल्या पत्रव्यवहारास विद्यापीठ प्रशासनाकडून त्वरित उत्तर मिळत नाही, याकडे लक्ष वेधले. दरम्यान, सदस्यांच्या पत्रास विद्यापीठाकडून वेळेत उत्तर मिळत नाही आणि तेही अर्धवट स्वरुपात असते. अधिसभा सदस्यांनाच योग्य उत्तर मिळत नसेल, अन्य घटकांचे काय स्थिती असेल, असाही प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. माझ्या प्रश्‍नास विद्यापीठाकडून सहा महिन्यांनी उत्तर मिळाल्याचे शशिकांत तिकोटे यांनी सभागृहात सांगितले. एकूणच सदस्यांच्या पत्रव्यवहाराकडे विद्यापीठ प्रशासनाकडून दिरंगाई होत असून, त्यावर त्वरित कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली. या प्रश्‍नांवरून सदस्यांनी विद्यापीठ प्रशासनास धारेवर धरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)