“औद्योगिक क्रांती केंद्राचे’ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन 

मुंबई येथील “औद्योगिक क्रांती केंद्र’ शेतीसाठी वरदान: मुख्यमंत्री फडणवीस 
नवी दिल्ली: सॅनफ्रान्सिस्को पाठोपाठ आता भारतात थेट मुंबई येथे उभारण्यात येणा-या औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या परिषदेत केले. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्यावतीने येथील हॉटेल आयटीसी मोर्य मध्ये आयोजित परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून जगभर तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती, संरक्षण आदी क्षेत्रांमध्ये उत्तम कार्य होत आहे. दावोस दौऱ्याच्यावेळी असे केंद्र मुंबई येथे स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आज वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्यावतीने आयोजित परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले. या केंद्रामुळे महाराष्ट्रासह देशातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेतीच्या विविध क्षेत्रात अचूक अंदाज वर्तविणे शक्‍य होणार आहे. शेतमाल विक्रीसाठी विविध बाजारपेठांमध्ये समन्वय स्थापित करणे, हवामान बदलानुसार शेतीची पीक व वान यांच्या पध्दतीत बदल करणे, शेती क्षेत्रात पीक साखळी निर्माण करणे, पिकांवर बोंडअळी सारख्या येणा-या रोगांवर उपाय, दुष्काळाच्या परिस्थितीवर उपाय आदी बाबी सुकर होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.
देशात हवामान बदलामुळे होणाऱ्या समस्यांवर औद्योगिक क्रांती केंद्राच्या माध्यमातून योग्य उपाय सुचविता येईत, आर्टिफिशीयल इंटेलिजन्स, ड्रोन आदिंचा प्रभावीपणे वापर करता येईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
औद्योगिक क्रांती केंद्र 4.0 च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने प्रशासकीय सेवांमध्ये सुधारणांसाठी घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)