छावणी परिषदेच्या नाक्‍यांवर चालकांची लूट

प्रशासनाने लूट केल्यास तक्रार करायची कुणाकडे?
15 मे रोजी दिली 1 मेची पावती : ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैशांची वसुली

नगर – येथील अहमदनगर छावणी परिषदेच्या नाक्‍यावर चालकांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शासनाने निर्धारित केलेल्या दरापेक्षा जास्त रक्कम वाहन चालकांकडून वसूल केली जात आहे. तसेच वाहनचालकांना पथकर भरल्यावर जुन्या पावत्या देण्यात येत आहेत. त्यामुळे छावणी परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ठेकेदाराकडून लूट झाल्यास प्रशासनाकडे दाद मागता येत होती. मात्र आता प्रशासनातील कर्मचारीच लूट करत असल्याने तक्रार करायची कुणाकडे, असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे.

नगर-पाथर्डी, नगर-सोलापूर महामार्ग तसेच नगर-जामखेड माहामार्गावरील छावणी परिषदेचे पथकर वसुली नाके आहेत. 30 एप्रिल रोजी या नाक्‍यांचा ठेका संपला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे निविदा काढता येत नसल्याने शुल्क वसुलीसाठी प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.

छावणी परिषदेच्या नाक्‍याचा वसुली ठेका ठेकेदाराला देण्यात आला होता. त्यावेळी ही मोठ्या प्रमाणात चालकांची लूट केली जात होती. याची तक्रार छावणी परिषदेकडे अनेक चालकांनी केली आहे. परंतु आता या नाक्‍यांची वसुली ही छावणी परिषदेकडे असून, यामध्ये अनेक अधिकारी, शिक्षक, कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यामुळे चालकांनी नेमकी तक्रार कोणाकडे करावी, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

नगर-पाथर्डी, नगर-सोलापूर महामार्ग तसेच नगर-जामखेड माहामार्गावरील छावणी परिषद महामंडळाच्या नाक्‍याचा मोठ्या प्रमाणात परागमन शुल्क वसूल केले जात आहे. तसेच चालकांनी पावतीची मागणी केली असता त्यांना जुन्या पावत्या दिल्या जात आहेत. 20, 40, 60 व 100 रुपये शुल्क घेतले जात आहेत. तसेच पैसे घेऊनही संबंधित कर्मचारी जुन्या पावत्या वाहनचालकांच्या हातावर टेकवत आहेत. प्रशासनातील कर्मचारीच अशी सर्वसामान्य वाहनचालकांची लूट करत असतील, तर न्याय मागायचा कुणाकडे, असा सवाल त्यांच्यातून उपस्थित केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)