क्रीडांगण : पुन्हा फिक्सिंगचा धुरळा (भाग २)

नितीन कुलकर्णी 

क्रिकेटच्या इतिहासात सर्वांत मोठा मॅच फिक्‍सिंगचा गैरव्यवहार भारत आणि दक्षिण आफ्रिका 2000 सालच्या मालिकेतून जगासमोर आला होता. या वादातून बाहेर येण्यास क्रिकेट जगाला काही वर्षे लागली. मात्र, पुन्हा आयपीएलच्या सामन्यात मॅच फिक्‍सिंगचा प्रकार उघडकीस आला. आता अल जझिरा वाहिनीने एका स्टिंग ऑपरेशनच्या आधारे 2011-12 या काळात एकूण 15 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी 26 वेळेस स्पॉट फिक्‍सिंग झाले होते, असा दावा केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा लेगस्पिनर दानिश कनेरियाने स्पॉट फिक्‍सिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. या सर्व आरोपांमध्ये, कबुलींमध्ये कितपत तथ्य आहे याचा सोक्षमोक्ष लावून त्याच्या तळाशी जाण्याची गरज आहे. अन्यथा नुसताच आरोपांचा धुरळा उडवत राहिल्यास त्यातून क्रिकेटविषयीची प्रतिमा डागाळत राहील. तसे होता कामा नये.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रीडांगण : पुन्हा फिक्सिंगचा धुरळा (भाग १)

स्पॉट फिक्‍सिंगवरून आयसीसी संभ्रमात असताना बंदी घातलेला पाकिस्तानचा लेगस्पिनर दानिश कनेरियाने मात्र स्पॉट फिक्‍सिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली दिली आहे. या कबुलीने पाकिस्तानचे क्रिकेट विश्‍व पुन्हा गोंधळात पडले आहे. कनेरिया म्हणतो, की आयसीसीने माझी स्थिती समजून घ्यावी आणि क्रिकेट मंडळ, चाहते आणि पाकिस्तानी नागरिकांनी मला माफ करावे. एका सट्टेबाजाच्या मार्फत आपण संपर्क ठेवला होता आणि अधिकाऱ्यांना यासंदर्भात मी वेळेवर माहिती पुरवली नाही, ही चूक झाली आणि त्याचे परिणाम आता भोगत आहे, अशा शब्दात दानिशने मत मांडले आहे. यासंदर्भात पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफ याने चिंता व्यक्त केली. दानिश प्रकरणात सुरुवातीच्या काळात क्रिकेट मंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटून त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न आपण केला होता. दानिशचे म्हणणे ऐकून घ्यावे, यासाठी आग्रह केला होता. दानिश निर्दोष आहे, असा दावा रशिद लतिफने केला आहे. माजी लेगस्पिनर अब्दुल कादिरने मात्र कनेरियाच्या कबुलीने पाकिस्तानच्या क्रिकेटची प्रतिमा डागाळली असल्याचे म्हटले आहे. खेळाडू काय विचार करतात, हे देवालाच ठाऊक.

आम्हाला चुकीच्या कारणामुळे चर्चेत राहवे लागत आहे. तो सहा वर्षे आमच्याशी खोटे बोलत राहिला, याचे आम्हाला अधिक दु:ख आहे, असे अब्दुल कादिर म्हणतात. माजी कसोटीपटू मोहसिनखान मात्र दानिशच्या कबुलीबाबत समाधानी आहेत. ते म्हणतात, सहा वर्षांनंतर का होईना कनोरियाने कबुली दिली हे बरे झाले. तो अगोदरच आजन्म बंदीचा सामना करत असताना त्याने अंतरात्म्याचा आवाज ऐकला, हे ठीक झाले. अर्थात अशा प्रकारची घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठा मॅच फिक्‍सिंगचा गैरव्यवहार भारत आणि दक्षिण आफ्रिका 2000 सालच्या मालिकेतून जगासमोर आला होता. दिल्ली पोलिसांनी या दोन्ही संघातील पाच खेळाडू मॅच फिक्‍स करण्यासाठी बुकीच्या संपर्कात होते, असे म्हटले आहे. या खुलाशानंतर जागतिक क्रिकेट डागाळले गेले. भारताचा तत्कालिन कर्णधार मोहंमद अझरुद्दीन, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएवर आरोपाचे बाऊन्सर होऊ लागले. प्रारंभी क्रोनिएने हे आरोप फेटाळून लावले, मात्र कालांतराने अझहरने आपली सट्टेबाजाशी भेट घडवून आणली होती, अशी कबुली क्रोनिएने दिली. त्यानंतर अझहर आणि अजय जडेजावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली. 2002 मध्ये क्रोनिएचा एका विमान अपघातात मृत्यू झाला.

या वादातून बाहेर येण्यास क्रिकेट जगाला काही वर्षे लागली. मात्र पुन्हा आयपीएलच्या सामन्यात मॅच फिक्‍सिंगचा प्रकार उघडकीस आला. 2013 मध्ये आयपीएलची टीम राजस्थान रॉयलचे खेळाडू श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडोलिया यांना आयपीएल सामन्यात स्पॉट फिक्‍सिंग केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. श्रीशांत आणि चव्हाणने कबुली दिल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. यागैरव्यवहारामुळे आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणात मॅच फिक्‍सिंग आणि स्पॉट फिक्‍सिंग होत असल्याचे समोर आले. काही दिवसांनंतर श्रीशांतला न्यायालयाकडून क्‍लिन चिट मिळाली, मात्र बीसीसीआयने त्यावरील बंदी हटवली नाही.

भारताच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूपैकी एक मनोज प्रभाकरवर देखील मॅच फिक्‍सिंगच्या आरोपावरून पाच वर्षे बंदी घालण्यात आली होती. या बंदीने त्याचे करियरच संपले. त्याच्यावर अनेक सट्टेबाजाशी संपर्क असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. 2000 मध्ये तर मनोज प्रभाकरने कपिल देव आणि अन्य खेळाडूंवर मॅच फिक्‍सिंगचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती, मात्र कालांतराने मनोज प्रभाकरच गाळात अडकला.

भारतीय क्रिकेटमध्ये अजय शर्मा हा प्रथम श्रेणीत 67.46 च्या सरासरीने सर्वाधिक वेगवान धावा करणारा फलंदाज म्हणून ओळखला जात असे. घरच्या मैदानावर अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. मात्र मॅच फिक्‍सिंगचा आरोप झाल्यानंतर अजय शर्माचे क्रिकेट करियर हे एका अर्थाने संपले. भारतीय क्रिकेटचा स्टार खेळाडू अजय जडेजाचा समावेश हा उकृष्ट क्षेत्ररक्षकामध्ये होतो. परंतु अझरुद्दीनसमवेतच अजय जडेजा देखील दोषी असल्याचे आढळून आल्याने त्यालाही उतरती कळा लागली. बीसीसीआयने पाच वर्षासाठी त्याच्यावर बंदी घातली.

याविरोधात अजय जडेजाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सुनावणीच्या वेळी त्याच्या बाजूने कोणीही युक्तिवाद केला नाही. त्यामुळे खटलाच निकाली काढला. अर्थात कालांतराने जडेजाला घरच्या मैदानावर खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. आता ताज्या प्रकरणामध्ये कितपत तथ्य आहे याचा सोक्षमोक्ष लावून त्याच्या तळाशी जाण्याची गरज आहे. अन्यथा नुसताच आरोपांचा धुरळा उडवत राहिल्यास त्यातून क्रिकेटविषयीची प्रतिमा डागाळत राहील. तसे होता कामा नये.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)