क्रीडांगण  : टी-20 क्रिकेट : ये शो है तीन घंटेका 

योगिता जगदाळे 

टी-20 क्रिकेट सामन्यांची लोकप्रियता आणि संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वन डे इंटरनॅशनल सामन्यांनी कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेला ओहटी लावली आणि आता त्याचे छोटे भावंड टी-20 क्रिकेट वनडे क्रिकेटवर मात करताना दिसत आहे. क्रिकेट सामने पाहण्यात पाच दिवस घालवण्यापेक्षा एक दिवस घालवलेला बरा आणि आता एक दिवस घालवण्यापेक्षा तीन तास घालवलेले बरे अशी मानसिकता झालेली आहे. टी-20 क्रिकेट सामने म्हणजे ये शो है तीन घंटोंका अशीच अवस्था आहे. कमी वेळात अधिक एक्‍साईटमेंट, अधिक करमणूक, चौकार-षटकारांची आतषबाजी असा सारा प्रकार आहे. 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी सामने आणि 50 षटकांच्या वन डे इंटरनॅशनल मालिकांनंतर आता त्यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका कोलकात्यातील ईडन गार्डनवरील सामन्याने 4 नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. ही मालिका रंगतदार होईल अशी अपेक्षा पहिल्या सामन्याने पूर्ण केली असली, तरी त्यातील लखनौ येथे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी झालेला दुसरा सामना अगदीच एकतर्फी झाला आहे आणि तिसरा सामना रविवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम मैदानावर होणार आहे. मालिकेचा निर्णय लागलेलाच असल्याने या सामन्यात भारतीय संघात नवोदितांना संधी देण्यासाठी अनेक बदल अपेक्षित आहेत.

या मालिकेतील दुसरा सामना उत्तर प्रदेशाच्या लखनौमधील अटल बिहारी वाजपेयी मैदानावर पार पडला. पार पडला असेच म्हटले पाहिजे, कारण त्यात फारशी स्पर्धा नव्हतीच. या एकतर्फी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा सहजपणे 71 धावांनी पराभव केला आणि मालिका खिशात घातली. या वर्षीचा भारताचा आणख़ी एक मालिका विजय आणि कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या या विजयाने अर्थातच सर्वच क्रिकेटप्रेमी खुशीत असणार, विशेष करून हिटमन रोहितचे चाहते. बदली कर्णधार म्हणून रोहितचे यश निर्विवाद आहे, दृष्ट लागावे असे आहे. नियमित कर्णधार विराट कोहली याच्या बदली रोहितला पाच मालिकांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली आणि पाचही मालिकांमध्ये त्याने निर्विवाद यश संपादन केले.

सध्या चालू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेबरोबरच महत्त्वाच्या एशिया कप स्पर्धेचा यात समावेश आहे.
चालू टी 20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 5 गडी आणि 2.1 षटके राखून पराभव केला, तर लखनौ येथे झालेल्या अटल बिहारी वाजपेयी मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात 71 धावांनी विंडिजला पराभूत केले. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या पहिल्या लो स्कोरिंग सामन्यात रोहित 6 धावांवर बाद झाला, पण दुसऱ्या सामन्यात त्याने ही कसर भरून काढत नेहमीप्रमाणेच धडाकेबाज शतक ठोकले. संघाच्या एकून 171 धावांपैकी 61 चेंडूत 111 धावा ठोकताना रोहितने 8 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत 182चा स्वप्नवत स्ट्राईक रेट राखला.

लखनौमध्ये झालेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना रोहितने संस्मरणीय बनवला. त्याचे टी 20 सामन्यातील हे चौथे विक्रमी शतक. यातील पहिल्या 50 धावा करण्यास त्याला 38 चेंडू लागले, तर पुढील 50 धावा केवळ 20 चेंडूत पूर्ण करत त्याने 58 चेंडूत शतक पूर्ण केले. आता रोहितच्या नावावर सर्वाधिक टी 20 शतकांची (4) आणि अर्धशतकांचीही (19) नोंद झाली आहे. विराट कोहलीला (2102 धावा) मागे टाकत त्याने टी 20 मधील सर्वाधिक धावांचा भारतीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. 2203 धावा करून रोहित शर्माने विराट कोहलीवर 101 धावांची आघाडी घेतली आहे. आता रोहितच्या पुढे केवळ न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल (2271) आहे. रोहितचा सध्याचा फॉर्म आणि वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीचा दर्जा पाहता चेन्नईत त्याने मार्टिन गुप्टिलचा विक्रम मोडीत काढणे अपेक्षित आहे.

रोहितची चार शतके अनुक्रमे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑक्‍टोबर 2015 मध्ये धर्मशाला येथे 106 धावा, श्रीलंकेविरुद्ध डिसेंबर 2017 मध्ये इंदूर येथे 118 धावा, इंग्लंडविरुद्ध जुलै 2018 मध्ये ब्रिस्टॉल येथे 100 नाबाद धावा आणि आता वेस्ट इंडिज विरुद्ध 2018 मध्ये लखनौ येथे 111 नाबाद धावा अशी आहेत. मर्यादित षटकांच्या मालिकांतील रोहित शर्माच्या या विजयी घोडदौडीने त्याला भारताचा नियमित कर्णधार बनवावा, निदान छोट्या फॉमट्‌समध्ये अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण आयपीएल मध्येही त्याची कामगिरी नेत्रदीपक आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आपल्या मुंबई इंडियन्स टीमला त्याने तीन वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवून दिले आहे. असा पराक्रम केवळ भारताच्या सर्वाधिक विजयी कर्णधाराने-महेद्र सिंग धोनीने केला आहे. विरोधाभास म्हणजे अगदी स्टारस्टडेड टीम असूनही भारताचा सर्व प्रकारच्या खेळातील कर्णधार विराट कोहली आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू) ला आयपीएलचे एकही विजेतेपद मिळवून देऊ शकलेला नाही.

क्रिकेट सामन्यांचे हे टी 20 (20-20 षटकांचे सामने) स्वरूप अतिशय लोकप्रिय होत आहे हे तर सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अगदी 50 षटकांच्या वन डे फॉमटलाही त्याने लोकप्रियतेत मागे टाकले आहे असे म्हणायला हरकत नसावी. आयपीएलप्रमाणेच आता सर्वच देशांत टी 20 स्पर्धांचे पेव फुटले आहे. अनेक खेळाडू देशाचे प्रतिनिधित्व करण्यापेक्षा अशा टी 20 स्पर्धांमध्ये खेळायला अधिक पसंती देऊ लागले आहेत, ही गोष्ट तर उघड उघड दिसत आहे. हे सारे धोके लक्षात घेऊनच आयसीसीने टी 20 स्पर्धांवर निर्बंध घालायला सुरुवात केली आहे, अशी चर्चा होत आहे.

एक कसोटी विक्रम दुर्लक्षित राहिला आहे, भारताने मायदेशात कसोटी विजयाचे शतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजविरुद्ध राजकोट येथे मिळवलेला विजय हा भारतचा 100 वा कसोटी विजय आहे. भारताच्या एकूण 147 कसोटी विजयापैकी 100 मायदेशात आणि 47 परदेशात मिळवलेले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)