क्रीडांगण : “ऑल इज (नॉट) वेल’ 

नितीन कुलकर्णी 

क्रिकेटसारख्या खेळामध्ये मिळवलेले यश हे नेहमीच सांघिक मानले जाते. यासाठी संघामध्ये एकजूट आणि समन्वय असणे आवश्‍यक असते. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती कर्णधाराची आणि प्रशिक्षकांची. किरकोळ स्वरूपाच्या कुरबुरी या चालतच असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. कारण संघातील खेळाडूंमधील अंतर्गत धुसफूस भविष्यात एकूण कामगिरीवर परिणाम करणारी ठरू शकते. म्हणूनच मिळालेल्या विजयामुळे त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. सध्या भारतीय संघात निवडप्रक्रियेपासून ते खेळाडू-खेळाडूंमध्ये अशीच धुसफूस सुरू आहे. या “ऑल इज नॉट वेल’ परिस्थितीचा आढावा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म इंडियाने पाहुण्या वेस्ट इंडिजला सलग दुसऱ्या कसोटीत पराभूत करून मालिका खिशात घातली. भारतीय संघाची कामगिरी चांगली होत असली तरी अलीकडच्या काळातील घटना पाहता संघातील स्थिती ऑल इज वेल वाटत नाही. संघ निवडीवरून वाद, नवख्या खेळाडूंना संधी न देताच डावलणे, संघाला सरावासाठी पुरेसा वेळ न देणे, रोहित शर्माची नाराजी यांसारख्या घटनांमुळे भारतीय संघातील वातावरण पोषक राहिलेले नाही. संघ निवडीवरून जर संघात वाद असतील तर त्याचा परिणाम संघाच्या कामगिरीवर होतो, हे सांगायची गरज नाही. आगामी विश्‍वचषक आणि ऑस्ट्रेलिया दौरा पाहता संघाच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबर निकोप वातावरण राहण्याची खबरदारी घ्यावी लागणार आहे.

हैदराबाद कसोटी सामन्यापूर्वी बीसीसीआयची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत क्रिकेट प्रशासन समितीबरोबरच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, खेळाडू रोहित शर्मा, निवड समितीतील प्रमुख एसएसके प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. कालांतराने ही बैठक अंतर्गत बाबींवर चर्चेसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले गेले. म्हणून कोणतेही ब्रिफिंग होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याबाबत चर्चा झाल्याचे नमूद करण्यात आले. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाला अतिरिक्त सराव सामन्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

रोहित शर्माने आशिया चषकमधील भारतीय संघातील खेळाडूंच्या कामगिरीचा लेखाजोखा सादर केला. क्रिकेट कंट्रोल बोर्डाशी निगडित असलेल्या खेळाडूंनी माध्यमांशी बोलू नये, या मुद्यावरही चर्चा केली गेली; परंतु बैठकीत असे काही घडले असेल, यावर क्रिकेट तज्ज्ञांना विश्‍वास नाही. कारण क्रिकेट मंडळ अशा प्रकारच्या घडामोडींवर तातडीने बैठक बोलावत नाही आणि व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करते. शेवटी रोहित शर्माला बैठकीत बोलावण्याची गरज का पडली, हे देखील कोडे न उलगडण्यासारखे आहे.

एकंदरित गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियातील खेळाडू निवडीवरून तापलेले वातावरण अजूनही कायम आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावरील मालिकेसाठी करुण नायरला संघात स्थान दिले नाही. तत्पूर्वी इंग्लंड दौऱ्यात त्याचा समावेश होता, मात्र त्याला संधी दिली गेली नाही. यावरून एखाद्या खेळाडूला संधी न देताच संघाबाहेर का काढले जाते, ही बाब मनाला न पटण्यासारखी आहे. संघ निवडीवरून रोहित शर्मा आणि मुरली विजयच्या देखील तक्रारी होत्या. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्माला बाहेर ठेवले असता हरभजनसिंगने आश्‍चर्य व्यक्त केले होते. अशा स्थितीत वरिष्ठ खेळाडूंना संघाबाहेर ठेवताना निवड मंडळ त्यांना विश्‍वासात घेते की नाही यावरून चर्चा रंगली होती. अर्थात संघ निवड करताना वरिष्ठ खेळाडूंशी चर्चा केल्याचा दावा निवड मंडळाने केला. परंतु खेळाडूंकडून अशा प्रकारच्या गोष्टीला दुजोरा गेलेला नाही. यादरम्यान आणखी एक धक्कादायक बातमी येऊन धडकली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात रोहित शर्माने अचानक विराट कोहलीला सोशल मीडियात अनफॉलो केल्याचे वृत्त आले. अशा प्रकारचा घटनाक्रम पाहता भारतीय क्रिकेट संघात फारसे काही ठीक चालले नाही, असे निदर्शनास येते.

संघाला अस्वस्थ परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी एकमेकांशी समोरासमोर चर्चा करायला हवी, असे क्रिकेटप्रेमींचे मत आहे. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्षाखेरीस मोठा दौरा असल्याने त्यापूर्वी संघात डागडुजी करणे गरजेचे आहे. याशिवाय पुढील वर्षी इंग्लंडमध्ये विश्‍वचषक स्पर्धा आहे. अशा स्थितीत सीओए आणि उर्वरित पक्षांत बैठक होणे अनिवार्य आहे. अर्थात या बैठकीतून काही बाबी स्पष्ट झाल्या आहेत.

2019 पर्यंत विराट कोहली हा कर्णधारपदावर कायम राहील आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया कप जिंकला असला तरी त्याला स्टॅंडबाय कर्णधार म्हणून ठेवले जाईल. निवडीवरून खेळाडूंनी आपले मत माध्यमांसमोर न मांडणे हिताचे ठरेल. पूर्वी देखील अशा प्रकारचे वक्तव्य खेळाडूंनी सार्वजनिक पातळीवर केल्यास शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागत होते. या बैठकीनंतर सर्वकाही ठीक होईल, असे वाटत असतानाच कसोटीसाठी 12 जणांचा संघ जाहीर केला गेला, तेव्हा आणखी एक चूक घडली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात कोणताही बदल केला नाही. याचाच अर्थ असा की, करूण नायरप्रमाणेच मयंक अग्रवालला देखील न खेळताच संघाबाहेर जाण्याची तयारी करावी लागणार आहे, असे दिसते.

क्रिकेटसारख्या खेळामध्ये मिळवलेले यश हे नेहमीच सांघिक मानले जाते. यासाठी संघामध्ये एकजूट आणि समन्वय असणे आवश्‍यक असते. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती कर्णधाराची आणि प्रशिक्षकांची. किरकोळ स्वरूपाच्या कुरबुरी या चालतच असल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरू शकते. कारण संघातील खेळाडूंमधील अंतर्गत
धुसफूस भविष्यात एकूण कामगिरीवर परिणाम करणारी ठरू शकते. म्हणूनच मिळालेल्या विजयामुळे त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)