प्लॅस्टिक आकाशकंदीलांची सर्रास विक्री

महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
 
पुणे – शहरात प्लॅस्टिक बंदीची कारवाई सुरू असतानाच, मध्यवस्तीत प्लॅस्टिकच्या आकाशकंदिलांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे एरव्ही दुकानांवर, कंपन्यांवर धाड टाकून प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त केल्याचा अभिमानाने सांगणारी महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र उघडपणे होणाऱ्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. या बंदीअंतर्गत 50 मायक्रॉनपेक्षा कमी वजनाच्या, विल्हेवाट न लावता येणाऱ्या प्लॅस्टिक वस्तूंचे वापर, विक्री आणि निर्मिती यावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर शहरात ठिकठिकाणी धाड टाकून प्लॅस्टिकच्या वस्तू जप्त करणे तसेच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे काम महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे. मात्र एकीकडे व्यावसायिकांवर कारवाई करणाऱ्या या संस्था रस्त्यावर उघडपणे होणाऱ्या आकाशकंदीलाच्या विक्रीबाबत मौन बाळगून आहेत.

रस्त्यावर सर्रासपणे विकले जाणारे प्लॅस्टिकचे आकाशकंदील या संस्थांना दिसत नाही का? महत्त्वाचे म्हणजे प्लॅस्टिकला बंदी असताना अशाप्रकारचे आकाशकंदील बाजारात आले कुठून, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. मंडळाकडून प्लॅस्टिकविरोधी मोहीम अतिशय काटेकोरपणे राबविली जात आहे. प्लॅस्टिकचा वापर असलेले आकाशकंदीलांची विक्री होत असल्यास, मंडळ निश्‍चितच त्याची तपासणी करून त्याबाबत कारवाई करेन.

– हेरंबप्रसाद गंधे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)