पशुसंवर्धन आधी घोळ कळतो नंतर योजना

सुहास बोराटे यांचा मासिक सभेत आरोप : सदस्यांनी अधिकाऱ्यांवर केली आगपाखड
उपसभापती अधिकाऱ्यांवर भडकले

पशुसंवर्धनच्या डॉक्‍टरांची चौकशी व्हावी
फोटोसेशनसाठीच पदाधिकाऱ्यांना निमंत्रण
बेजबाबदारपणे वागणाऱ्यांना पाठिशी घालू नका
पदाधिकारी रिकामटेकडे वाटतात का ?

कराड – पशुसंवर्धन हा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. मात्र या विभागाच्या शेतकरी हिताच्या कोणत्याच योजनांची माहिती सदस्यांना दिली जात नाही. सदस्यांचे विरोधक असणाऱ्यांना अगोदर फॉर्म भेटतात. तर पदाधिकाऱ्यांना अगोदर योजनेत झालेला घोळ कळतो आणि नंतर योजना कळते. आम्हाला अंधारात ठेवून काम करणारे तुम्ही कोण. आम्हालाही देवाने अक्कल दिली आहे. प्रत्येक गोष्टीत चैन सिस्टीम राबवली जात असून पंचायत समितीत याचा सुळसुळाट झाला असल्याचा आरोप करत उपसभापती सुहास बोराटे सभेत कडाडले. पशुसंवर्धनच्या कोणत्याही दवाखान्यात डॉक्‍टर उपस्थित नसतात, काहीजण उर्मट उत्तरे देतात, साथरोगाची माहिती मिळूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा तक्रारींचा पाढा वाचत अशा स्वयंघोषित डॉक्‍टरांची चौकशी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव पंचायत समितीच्या बुधवारी झालेल्या मासिक सभेत करण्यात आला.

सभापती फरिदा इनामदार अध्यक्षस्थानी होत्या. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, उपसभापती सुहास बोराटे यांची प्रमुख उपस्थिती होती. पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डॉ. पवार यांनी विभागाचा आढावा घेण्यास सुरुवात केली असता त्यांना मध्येच थांबवत माजीउपसभापती रमेश देशमुख यांनी पशुसंवर्धन विभाग स्वयंघोषित असल्याप्रमाणे काम करीत असल्याचा आरोप केला. प्रत्येक सभेत सेस फंडातील कामांची माहिती दिली जाते. मात्र विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची कोणतीच माहिती सदस्यांना दिली जात नसल्याचे ते म्हणाले. यावर उपसभापती सुहास बोराटे जोरदार कडाडले. आपली माणसे या नात्याने आम्ही कधीही सभेत विषय काढला नाही. मात्र या विभागामार्फत घोळ घातला जात आहे. अर्ज भरणारेही यांचेच आणि बिले काढणारेही यांचेच असतात. दुकानदार पंचायत समितीत येऊन बसतात. पूर्णपणे चैन सिस्टीम राबवली जात असल्याचा आरोप केला.

पशुसंवर्धन विभागाची कोणतीच योजना सदस्यांपर्यंत येऊ दिली जात नाही. उलट जिल्हा परिषद सदस्यांना योजनांची माहिती देवून त्यांचे फॉर्म घेतले जातात. सदस्यांनाच विचारात घेतले जात नसेल तर यापुढे कोणत्याच सभेत विभागाचा आढावा घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका व्यक्‍त केली. मंत्रालयापर्यंत या विभागाच्या डॉक्‍टरांची चौकशी करण्याचा ठराव मांडण्याच्या सूचना उपसभापती बोराटे यांनी केल्या.

दरम्यान एकात्मिक बालविकास, शिक्षण, कृषी, विभागाचाही आढावा घेण्यात आला. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आडके यांनी तालुक्‍यातील 38 गावे टंचाईग्रस्त असल्याचे सांगितले. अनेक विभागाचे अधिकारी गैरहजर राहिल्याबाबत सभापती इनामदार यांनी नाराजी व्यक्‍त केली. तसेच चंद्रकांत निकम यांची शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारीपदी निवड झाल्याबाबत त्यांचा सभापती फरिदा इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रितसर निमंत्रण मिळाले तरच येऊ…
पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांकडून फक्‍त फोटोसेशनसाठीच बोलावले जाते. कोणताही कार्यक्रम असला तरी त्याचे लेखी निमंत्रण दिली जात नसल्याचा आरोप सभापती फरिदा इनामदार यांनी केला. तसेच यापुढे निमंत्रण मिळाले तरच येवू नाहीतर येणार नाही. सदस्यांनी आपापल्या भागातील अंगणवाड्यांची जबाबदारी घेत वेळावेळी तपासणी करावी व बेकायदेशीर वागणाऱ्यांना पाठिशी घालू नका अशा सूचनाही केल्या.

सभापती-उपसभापती शोभेच्या वस्तू ?
पंचायत समितीचे सभापती व उपसभापती हे महत्त्वाचे घटक आहेत. सदस्यांबरोबरच ग्रामीण भागातील जनतेचे प्रतिनिधीत्व ते करत असतात. त्यामुळे जनतेच्या हिताच्या गोष्टी त्यांना माहित असणे गरजेचे आहे. अधिकाऱ्यांनीही सदस्यांना नसेल तर सभापती-उपसभापती यांना विचारात घेऊन प्रत्येक योजना राबविली पाहिजे. मात्र अधिकाऱ्यांकडून तसे होत नसून त्यांना ते शोभेच्या वस्तू वाटतात का सवाल रमेश देशमुख यांनी उपस्थित केला.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)