एसटी स्थानकातील पोलीस मदत केंद्र ‘कुलूप बंद’

वल्लभनगर : एस. टी. स्थानकातील बंद असलेले पोलीस मदत केंद्र.

प्रशासनाचे दुर्लक्ष : वल्लभनगर आगाराची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर

पिंपरी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगारामधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून येथील पोलीस मदत केंद्र बंद असल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या एस.टी स्थानकात बाहेरगावी जाण्यासाठी हजारो प्रवाशांची दररोज ये-जा सुरु असते. मात्र, पोलीस मदत केंद्र बंद असल्याने नागरिकांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील वल्लभनगर या ठिकाणी एसटीचे आगार आहे. या स्थानकातून महाराष्ट्राच्या विविध भागात व आंतरराज्यातही एसटीची सेवा पुरवली जाते. त्यामुळे, बाहेरील राज्यातील प्रवाशांची येथे वर्दळ असते. प्रशस्त पार्किंगची व्यवस्था असल्याने येथे अनेक राज्य परिवहन महामंडळाची वाहने येथे मुक्कामी असतात. मात्र, येथे सुरक्षेची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच, महिलांच्या सुरक्षेसाठी स्थानकात महिला पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, ते बंद असल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

एस. टी. आगाराच्या सुरक्षा गेटवरती कोणताही सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेला नाही. यामुळे, स्थानकात ये-जा करणाऱ्या नागरिकांची चौकशी करण्यासाठी कोणीही नसल्याने एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता आहे. तसेच, आगार परिसरामध्ये अनेक भुरट्या चोरांचा वावर असल्याने अनेक प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू आगार परिसरातून चोरीला गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

या ठिकाणी अनेक टवाळखोर हुल्लडबाजी करताना आढळून येतात. तसेच, रात्रीच्या सुमारास मद्यपींचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. खासगी बस चालकांनी भाडेवाढ केल्यामुळे प्रवासी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी सेवेकडे वळले आहेत. यामुळे, आगारात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असल्याने पोलीस मदत केंद्र सुरु करावे, अशी मागणी अनेक प्रवाशांनी केली आहे.

“मी व्यवसायिक असल्याने वल्लभनगर स्थानकातून राज्यातील इतर ठिकाणी सतत ये-जा सुरु असते. परंतु, या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पोलीस मदत केंद्र चार महिन्यापूर्वी बंद झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
– विजया ठोसर, प्रवासी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)