शहरात ‘आरटीई’च्या 529 जागा रिक्‍त

सहाव्या फेरीस विलंब : विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजीचा सूर

पिंपरी – अर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय मुलांसाठी “आरटीई’ अंतर्गत प्रवेश देण्यात आले आहेत. मात्र, या प्रवेशाची सहावी फेरी झाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेशाची प्रतिक्षाच करावी लागत आहे. सद्यस्थितीत “आरटीई’च्या पाचव्या फेरीअखेर शहरातील शाळांमध्ये 529 जागा रिक्‍त आहेत.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिक्षण घेण्यासाठी “आरटीई’अंतर्गत 25 टक्के जागांचा कोटा आहे. यावर्षी पाचव्या फेरीअखेर दोन हजार जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. “आरटीई’अंतर्गत प्रवेशासाठी अद्याप 529 जागा रिक्त आहेत. मात्र, या प्रवेशास विलंब होत असल्यामुळे पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. पालकांनीही प्रवेशासाठी संपर्क साधण्याची आवश्‍यकता होती. यामुळे सहावी फेरी होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. यंदाच्या वर्षी “आरटीई’साठी विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यामधील 4796 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

शहरातील शाळा सुरू होऊन सहा महिने पूर्ण झाले आहेत. परंतु, “आरटीई’ अंतर्गत प्रवेशाच्या कित्येक जागा रिक्त आहेत. शहरात 175 “आरटीई’ प्रवेश देण्यास पात्र शाळा आहेत. यावर्षी जानेवारीपासून सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू होती. तरीही “आरटीई’ प्रवेशाच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. “आरटीई’ प्रवेशाची सक्षम व तंतोतत अंमलबजावणी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे.

“शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना “आरटीई’अंतर्गत शिक्षण मिळण्यासाठी या वर्षी पाचव्या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या फेरीला पालकांचा प्रतिसाद कमी मिळाला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेमध्ये संपर्क साधण्याची गरज होती.
– ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.

दरवर्षी आरटीईच्या जागा शिल्लक राहतात. तसेच, मागील पाच वर्षापेक्षा यंदा जागांचे प्रमाण वाढले असले तरी रिक्त जागांचा प्रश्न कायम आहे. “आरटीई’ अंतर्गत नोंदणी झालेल्या काही शाळांमध्ये “अलॉटमेंट’ होऊनही विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जागा रिक्त ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान का केले जाते? असा प्रश्न पालक विचारत आहेत.

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन सहा महिने झाले तरीही “आरटीई’च्या राखीव जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यास पाचव्या फेरीअखेर पालकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. यामध्ये, तब्बल एक हजार 883 विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळांमध्ये संपर्क साधला नसल्याचे, शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)