संतांच्या विचारांची वाटणी परवडणारी नाही!

डॉ. रामचंद्र देखणे : कलारंजन प्रतिष्ठानच्या वतीने सांगवीत ज्ञानगंगा व्याख्यानमाला

विडंबन गीतांनी हास्य कल्लोळ

तत्पूर्वी, एकपात्री हास्यकलाकार बंडा जोशी आणि विडंबनकार अनिल दीक्षित यांनी या व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफले. जोशी यांनी मैफिलीची सुरुवात मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला तिचा बाप कसा मारतो, याचे वर्णन करणाऱ्या “आता वाजले की बारा…’ या लावणीच्या विडंबनाने केली. दीक्षित यांनी बायका नवऱ्याशी एकाच महिन्यात दोन प्रकारे कशा वागतात, यावर आधारित विडंबन सादर केले. त्यानंतर आताच्या सोशल मीडियाच्या काळात पत्रलेखन दुर्मिळ झाल्यामुळे टपाल दिनानिमित्त एक तरी पत्र लिहावे, असे उपस्थितांना आवाहन केले.

सांगवी-कोणत्याही संस्कृतीच्या जडणघडणीत शेकडो वर्षाची परंपरा असते. महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या जडण-घडणीत संतांची शिकवण, लोककलावंतांचे प्रबोधन आणि विचारवंतांचे कार्य या सर्वांतून आजचा महाराष्ट्र साकारला आहे. पण ते टिकविण्यासाठी विचारांची वाटणी करून चालणार नाही, अशी अपेक्षा संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी सांगवी येथील कलारंजन प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या ज्ञानगंगा व्याख्यानमालेत “महाराष्ट्र : परंपरा आणि प्रबोधन’ यावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक संतोष कांबळे, माधवी राजापुरे, सूर्यकांत गोफणे, ऍड. शंकर थिटे, श्रीकांत चौगुले आदी उपस्थित होते.

डॉ. देखणे म्हणाले, की भारतीय संस्कृतीत असलेली ज्ञानाची परंपरा पुढे नेण्याचे काम संतांनी केले. संतांनी सर्वसामान्यांना समजेल अशा शब्दात आपले विचार मांडले, त्यामुळे संतसाहित्य हे लोकवेद ठरते. संतांनी लोकभाषेचा वापर केल्यामुळेच आज महाराष्ट्रात बोलीभाषांचे अस्तित्व आहे. संतांनी मराठी भाषा समृद्ध केली. संतसाहित्य घराघरात पोहोचले असल्यामुळे मराठी भाषेला लयाची भीती नाही.

डॉ. देखणे यांनी पुढे सांगितले, की संतांची जीवनमूल्ये लोककलावंतांनी लोकांसमोर नेली. पण आज लोककलावंत आणि त्यांचा आश्रय कमी होत चालला आहे. दररोज सकाळी दारात येणारा वासुदेवही आज दुर्मिळ झाला आहे. स्वत:पुरते पाहणारा आत्ममग्न समाज निर्माण होत आहे, हे समाजाच्या दृष्टीने धोकादायक आहे. शंकर जगताप यांनीही मनोगत व्यक्‍त केले. सूर्यकांत गोफणे यांनी प्रास्ताविक केले. रामकृष्ण राणे यांनी सूत्रसंचालन, तर श्रीकांत चौगुले यांनी आभार मानले.

“मोबाईलचं जाम याड लागलं रं…’ हे सैराट चित्रपटातील गाण्याच्या चालीवरून मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारी तारांबळ, गडबड, गोंधळ उडविणारे प्रसंग वर्णन करणारे विडंबन, “हेल्मेट सक्‍तीने वात आणला गं बाई…’ ही हेल्मेट सक्‍ती विरोधातील जनसामान्यांची भावना व्यक्‍त करणारी विडंबन रचना अंगाई गीताच्या चालीतून सादर केलेल्या हास्य कलाकार बंडा जोशी आणि अनिल दीक्षित यांच्या विडंबनपर गीतांनी रसिक हास्यकल्लोळात बुडाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)