महापालिकेच्या 27 शाळा मुख्याध्यापकांविना

-कामकाजाची कसरत
-प्रभारी मुख्याध्यापक हाकताहेत गाडा

पिंपरी -शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरातील 105 शाळांपैकी 27 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे, शहरातील बहुतांशी शाळांचा गाडा हाकण्याची वेळ प्रभारी मुख्याध्यापकांवर आली आहे.

शहरातील बहुतांश शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक असल्याने महापालिकेच्या शाळा बे-भरवशाच्या बनल्या आहेत. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. मात्र, अनेक शाळांची जबाबदारी प्रभारी मुख्याध्यापकच पार पाडताना दिसत आहेत. यामुळे, विद्यार्थ्यांवर लक्ष द्यायचे का शिक्षकांवर या द्विधा मनस्थितीत प्रभारी मुख्याध्यापक अडकले आहेत.

शहरातील अनेक शाळा मुख्याध्यापकाविना असल्याने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. मुख्याध्यापक नसल्याने गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे नुकत्याच लागलेल्या निकालावरून दिसून येत आहे. शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांवर नियंत्रण ठेवणे व शाळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मुख्याध्यापकांची असल्याने पदमान्य असलेल्या जागा लवकरात-लवकर भरण्याची गरज आहे. पाच महिन्यांपूर्वी मुख्याध्यापकांची रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने स्थगिती दिल्याचे, कारण माध्यमिक विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रभारी मुख्याध्यापक चालढकल करतात

शाळांमध्ये पूर्ण वेळ मुख्याध्यापक असल्यानंतर जबाबदारीने काम पूर्ण करण्याकडे कल असतो. मात्र, शहरातील बहुतांश शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक असल्याने कामामध्ये कसूर केली जात असल्याचे दिसून येते. प्रभारी मुख्याध्यापक असणाऱ्या कित्येक शाळांची गुणवत्ताही ढासळली असल्याची पाहावयास मिळत आहे. यामुळे, मुख्याध्यापकांची रिक्त पदे लवकरात-लवकर भरण्याची आवश्‍यकता आहे.

इंग्रजी शाळांमध्ये पूर्ण वेळ मुख्याध्यापक

महापालिकेच्या शहरात इंग्रजी माध्यमातील दोन शाळा आहेत. या दोन्ही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, मराठी माध्यमातील शाळांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तर मराठी शाळा मुख्याध्यापकाविना सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)