पिंपरी – शिवशाही व्यापारी संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले यांच्याकडे सोपविले आहेत. वैयक्तिक कारणामुळे हे राजीनामे देत असल्याचे नमूद केले आहे. मात्र, सामूहिक राजीनाम्यामागे नाराजी असल्याची चर्चा आहे. राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये गणेश आहेर, रत्नप्रभा नवघरे, नीलेश भोरे, गोरख पाटील-निलंगेकर यांचा समावेश आहे.
शहर व परिसरातील व्यापाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी स्थापन केलेल्या शिवशाही व्यापारी सेनेला वर्षभराच्या आतच गळती लागली आहे. संघटना ध्येयापासून भरकटल्यामुळे राजीनामा देत असल्याची प्रतिक्रिया गणेश आहेर यांनी दिली आहे. आता या संघटनेशी माझा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.