खडकीतील प्रकार : प्रेमाचे आमिष दाखवून लुबाडले
खडकी – प्रेमाचे आमिष दाखवून नंतर घरच्यांना प्रेम संबंधाचे सांगेल, असे धमकावत तरुणीकडून 6 लाख 18 हजार रुपये लुबाडणाऱ्या एका विवाहित तरुणास खडकी पोलिसांनी सोमवारी (दि. 17) अटक केली.चेतन अशोक खोसे (वय-32, रा. माऊंटवर्ड प्रिस्टीन सोसायटी, खडकी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका 28 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खोसे व फिर्यादी तरुणी एका बॅंकेत कामाला आहेत. एकाच ठिकाणी कामास असल्याने दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध झाले. हळुहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. नंतर तरुणीला खोसे विवाहित असल्याचे समजले. त्यानंतर तिने खोसेसोबत संबंध तोडले. खोसे त्यामुळे रागावला गेला.
तुझ्या घरच्यांना आपल्या प्रेमसंबंधाचे सांगतो. तसेच तुझे व तुझ्या बहिणीचे लग्न कसे होते ते पाहतो, असे तरुणीस धमकावत तिच्याकडून मे 2018 ते 5 जूनपर्यंत त्याने आतापर्यंत 6 लाख 18 हजार रुपये ब्लॅकमेलिंगद्वारे उकाळले. फिर्यादी तरुणीने अखेर घरच्यांना विश्वासात घेऊन सदर बाब सांगितली. नंतर खडकी पोलिसांत धाव घेतली. ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी खोसेवर गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शफीक पठाण करीत आहेत.