एक लाख 10 हजाराला फसवले : निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा
पिंपरी – गुगलवर नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर एकाने “तुम्हाला हुंदाई कार कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. तुम्ही घरून काम करू शकता’ असे सांगून ज्येष्ठ नागरिकाला 1 लाख 10 हजारांचा गंडा घातला. ही घटना 11 ते 14 एप्रिल या कालावधीत निगडी येथे घडली.
याप्रकरणी जोसेफ रजिनाल्ड मेंडोंसा (वय 61, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोसेफ यांना नोकरीची गरज असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी गुगल वेबसाईटवर नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्यानंतर अज्ञातांनी त्यांना फोन करुन तुम्हाला हुंदाई या कार कंपनीत नोकरी लागली असल्याचे सांगितले. त्यांनतर वेगवेगळी कारण सांगून जोसेफ यांच्याकडून ठगाने वेळोवेळी 1 लाख 10 हजार 600 रुपये बॅंक खात्यावर भरण्यास सांगितले. पैसे घेऊनही जोसेफ यांना नोकरी दिली नाही, तसेच घेतलेले पैसेही परत केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.