पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 18 शाळांमधील विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या सर्व शाळांमधून केवळ तीनच विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवू शकले आहेत. त्यामुळे यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून देण्यात येणारे लाख रुपयांच्या बक्षिसाचे केवळ तीनच विद्यार्थी मानकरी ठरले आहेत.
गेल्यावर्षी 18 विद्यार्थी एक लाख रुपये बक्षीसाचे मानकरी ठरले होते. दहावीच्या परीक्षेत महापालिकेच्या अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालय पिंपळे सौदागरचा निवृत्ती लक्ष्मण साखरे याने 93.80 टक्के. त्याच शाळेचा प्रथमेश शहाजी जाधव याने 93.20 टक्के आणि थेरगाव माध्यमिक विद्यालयाचा राज उदय गिरी याने 93.40 टक्के मिळवीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रोत्साहनपर बक्षीस योजने अंतर्गत एक लाख रुपये बक्षीसाचे मानकरी ठरले आहेत.
महापालिकेने 2013 पासून दहावीत 80 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस योजना सुरू केली आहे. महापालिकेची 18 माध्यमिक विद्यालये आहेत. या योजनेअंतर्गत 90 टक्क्याहून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्याला एक लाख रुपये, 85 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना 50 हजार आणि 80 टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 25 हजार रुपये देऊन त्याचा गौरव करण्यात येतो.
या योजनेमुळे मागील सात वर्षांत अनेक गरीब घरची मुले लखपती झाली. त्यांच्या नावे थेट धनादेश मिळाला. यामुळे प्रोत्साहित होऊन अनेक मुलांनी चांगले गुण मिळविण्यासाठी धडपड सुरू केली होती. त्याचाच चांगला परिणाम म्हणून गेल्या वर्षी 91 विद्यार्थी बक्षीस पात्र निवडले होते. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळाले. मात्र, यंदा महापालिका शाळांचा पाच वर्षांतील सर्वात निचांकी निकाल लागला आहे. परिणामी लाखाचे मानकरी असणाऱ्या विद्यार्थी संख्येत मोठी घट झाली. त्यानुसार 85 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या 21 विद्यार्थ्यांना 50 हजाराचे बक्षीस मिळणार आहे.