बोबडे, कुटे, लांडगे, हिंगे यांची वर्णी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती सभापतीदासाठी अश्विनी बोबडे, महिला व बालकल्याण समिती निर्मला कुटे, शहर सुधारणा समिती राजेंद्र लांडगे आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापतीपदासाठी तुषार हिंगे यांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वांचे एकच अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित आहे. शुक्रवारी (दि. 14) त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. दरम्यान, विरोधात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने अर्ज भरला नसल्याने निवडी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सभापतीपदासाठी अर्ज सादर करायवाची सोमवारी(दि.10) अखेरची मुदत होती. दुपारी 3 ते 5 या वेळेत नगरसचिव कार्यालयात अर्ज दाखल करायचे होते. सत्ताधारी भाजपकडून प्रत्येकी एक अर्ज भरण्यात आला. त्यामुळे त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. सभापतीपदाची प्रत्यक्ष निवडणूक शुक्रवारी(दि. 14) रोजी सकाळी 11 वाजता महापालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील मधुकर पवळे सभागृहात निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.
विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची 1 वर्षाची मुदत संपली आहे. नवीन सदस्यांची मे महिन्याच्या महासभेत निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एका सदस्यांची प्रत्येक विषय समितीत निवड करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपचे बलाबल असल्याने भाजपचेच सभापती होणार हे निश्चित होते.
शिवसेनेला सत्तेत वाटा नाहीच
लोकसभेला भाजप-शिवसेनेची युती होती, ती विधानसभेलादेखील कायम राहणार असल्याचे सूतोवाच दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केले आहे. तर महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपत बंड होऊनही, शिवसेनेने आपला युती धर्म पाळला. त्यानंतर शिवसेनेला एखाद्या विषय समितीचे अध्यक्षपद देण्याचे सूतोवाच शहर पदाधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, या चारपैकी एकाही समितच्या अध्यक्षपदी शिवसेनेला संधी देण्यात आली नाही.