पिंपरी – रिक्षामधून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. ही घटना रविवारी (दि.2) रात्री पावणे तीनच्या सुमारास हिंजवडीतील भटेवरानगर येथे घडली.
याप्रकरणी तेजस राधेशाम ठाकूर (वय 29, रा.भटेवरानगर, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री पावणे तीनच्या सुमारास फिर्यादी तेजस आपले काम आटोपून हिंजवडीतील भटेवरानगर येथील रस्त्यावरुन त्यांच्या दुचाकीने घरी जात होते. यावेळी फोन आल्याने ते दुचाकी बाजूला घेऊन मोबाईल पाहत होते. त्यावेळी एका रिक्षा त्यांच्याजवळ आली. त्यातील प्रवाशाने तेजसला वाकडचा रस्ता विचारला. यामुळे तेजस त्यांना रस्ता सांगत होता. इतक्यात त्याने तेजसचा मोबाईल हिसकावला आणि रिक्षातून पळ काढला.