पिंपरी – बंदी असतानादेखील प्लॅस्टिक वापरणाऱ्या व्यावसायिकांवर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने धडक कारवाई केली आहे. डांगे चौक येथील पुरोहित स्वीट्स व न्यू भैरव सिलेक्शन यांच्याकडे प्लॅस्टिक पिशव्या सापडल्याने प्रत्येकी पाच हजार तर रस्त्यावर थुंकणाऱ्या एकाकडून 150 रुपये असा एकूण दहा हजार एकशे पन्नास रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई सोमवारी (दि.14) करण्यात आली.
प्रभाग क्रमांक 24 मध्ये सोमवारी ( दि.14) डांगे चौक 16 नंबर बसस्टॉप येथे 10 दुकानांची तपासणी केली असता, त्यापैकी दोन दुकानदारांकडून (पुरोहित स्वीट्स 9.446 किलो) आणि ( न्यू भैरव सिलेक्शन 1 किलो ) प्लॅस्टिक सापडल्यांने त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच थुंकल्यामुळे एका व्यक्तीकडून 150 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ही सर्व कारवाई आरोग्य अधिकारी संजय कुलकर्णी, मुख्य आरोग्य निरीक्षक राजीव बेद आणि आरोग्य निरीक्षक एस.बी.चन्नाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. महापालिकेकडून प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. नागरिकांनी प्लॅस्टिक, थर्माकोलचा वापर टाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.