मान्सूनपूर्व तयारी बैठकीत महापालिका प्रशासनाकडून आढावा
पिंपरी – पावसाळ्यात नदीपात्रातील पुराचे पाणी नागरीवस्तीत शिरते. अशा ठिकाणांची माहिती अद्ययावत करण्यात आली असून, पूर परिस्थितीत नदीपात्रालगतच्या रहिवाशांचे स्थलांतर करताना स्थानिक रहिवासी विरोध करत असतात. जीवितहानी होऊ नये याकरिता या रहिवाशांचे स्थलांतर करताना यंदा पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.14) बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही माहिती देण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीला महापालिका अग्निशमन दलाचे किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, सर्व विभागप्रमुख व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा राडारोडा टाकला जात असल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, राडारोडा हटविण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत. याशिवाय आपत्कालीन स्थितीत समन्वय साधण्यासाठी एका अधिकाऱ्याची नोडल ऑफिसरपदी नियुक्ती करण्याचे देखील सुचविण्यात येणार आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाला महापालिका प्रशासनाच्या वतीने लेखी पत्र दिले जाणार आहे.
अधिकाऱ्यांचा व्हॉटस् ऍप ग्रुप
आपत्ती काळात परिस्थितीची माहिती व्हावी, याकरिता महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी व पोलीस कर्मचारी याचा समावेश असलेला व्हॉटस् ऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपवर सर्व अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहू शकणार आहेत. तसेच कोणत्या भागात परिस्थिती कशी आहे? याचेदेखील अपडेटस् मिळणार आहेत.
नालेसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले असून, महिनाअखेरपर्यंत शहरातील सर्व नाले, गटारांची स्वच्छता केली पूर्ण केली जाणार असल्याची माहिती डॉ. के. अनिल रॉय यांनी यावेळी दिली. एखादी आपत्तीजनक घटना घडल्यास, त्यावरत उपापययोजना करण्यासाठी या काळात आपत्ती व्यवस्थापन व महापालिका नियंत्रण कक्षाचा भारतीय लष्कर आणि एनडीआरएफशी 24 तास समन्वय ठेवला जाणार आहे. प्रत्येक विभागातील अधिकारी व कमरचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, या काळात मुख्यालय न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.