पिंपरी – गोदामामध्ये ठेवलेले 90 कूलर व एक्झॉस्ट चिमणी असा 5 लाख 93 हजार 16 रुपयाचा ऐवज चोरीला गेला. 7 मे रात्री ते 8 मे सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ताथवडे येथील निंबाळकर रघुनंदन मंगल कार्यालयाच्या मागील गोदामात चोरट्यांनी हात साफ केला.
याप्रकरणी कमलेश रमेश थिरवानी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन वाकड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमलेश यांचा कूलर विक्रीचा व्यवसाय आहे. विक्रीसाठी लागणारे साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी निंबाळकर रघुनंदन मंगलकार्यालयाच्या मागे पत्र्याच्या शेडचे गोडावून उभारले आहे.
या गोडावूनमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन 5 लाख 87 हजार रुपये किंमतीचे सिंफनी कंपनीचे 90 कूलर व फेबर कंपनीची पाच हजार पाचशे रुपये किंमतीची किचन एक्झॉस्ट चिमणी, असा एकूण 5 लाख 92 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.