खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून गायींचा कोंडमारा

भिंतीचे काम तात्काळ थांबवावे : अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा

सांगवी – खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने भिंत बांधण्याचे काम हाती घेतल्याने गायी गुरांचा कोंडमारा होऊन हाल होणार आहेत. एकीकडे सरकार गो पालनाचा नारा देत आहे, तर दुसरीकडे मात्र याच गायी मोकळ्या हवेवाचून बंदिस्त होत आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाने मुक्‍या जनावरांचा विचार करून भिंतीचे काम थांबवावे; अन्यथा महामार्गावर गायी आणून रास्ता रोको करू, असा इशारा गवळी समाज व छावा मराठा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीनजीक इंग्रज सरकारने धोबी आणि गवळी समाजासाठी जागा देऊन त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले होते. तेव्हापासून गवळी आणि धोबी समाज आपापले व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत आहेत. आज या ठिकाणी 70 ते 80 गवळी गोपालन करीत आहेत. सकाळी लवकर उठून गायींच्या गोठ्याची स्वच्छता, गायी धुणे, त्यांना चारा पाणी देणे, दूध काढण्याची कामे करतात. सायंकाळी पुन्हा हेच काम असते. आजपर्यंत गुण्यागोविंदाने जगणारा हा समाज अलिकडे राजकीय लोकांचे लक्ष्य बनत चालला आहे. स्थानिक राजकीय लोकांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. एवढेच नाही तर या गवळी समाजाला खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जात असल्याचा आरोप छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष राम जाधव यांनी केला.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला हाताशी धरून स्थानिक राजकीय लोकच या ठिकाणी भिंत बांधून घेत आहेत. वस्तुतः या ठिकाणी मोकळे मैदान असून भिंत बांधण्याची आवश्‍यकता नाही. सध्या इथे भिंत नसल्याने गवळी लोक गायींच्या शेणापासून गोवऱ्या थापतात. त्यामुळे गायींचे शेण ड्रेनेजलाईनमध्ये जाणे थांबते. त्यामुळे जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होत आहे. ही भिंत बांधल्यावर गायींच्या गोठ्यात कसलीच हवा जाणार नाही.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कहर म्हणजे या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी रस्ता म्हणून अर्धवर्तुळाकार प्रवेशद्वार बनविण्यात येणार आहे. गायींसाठी आणण्यात येणारा चारा, कडबा आतमध्ये कसा आणायचा ? एखादी गाय मृत झाल्यास या प्रवेशद्वारातून बाहेर कशी न्यायची ? भिंतीमुळे हवा अडली जाणार असून, मोकळ्या हवेशिवाय गायींचा कोंडमारा होणार नाही का ? इतक्‍या गायींचे शेण दररोज ड्रेनेजमध्ये जाऊन नदी प्रदूषण होईल, त्याचे काय ? स्थानिक एक दोन राजकीय लोकांच्या हट्टापायी कॅन्टोन्मेंट बोर्ड गायींच्या जीवाशी का खेळत आहे, असे सवाल छावा मराठा संघटनेतर्फे विचारण्यात येत आहेत.

“गवळी समाजावर स्थानिक राजकीय व्यक्तींचा हट्ट पुरविण्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अन्याय करीत आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, छावा मराठा संघटना गवळी समाजाच्या पाठीशी उभी आहे. सरकार गोपालन करण्यासाठी प्रोत्साहन देत असताना कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन मात्र या गोपालनकर्त्यांच्या मुळावर उठले आहे. गायींच्या आरोग्याचा विचार करून इथे होत असलेल्या भिंतीचे काम थांबवावे, अन्यथा गवळी समाजाला सोबत घेऊन छावा मराठा संघटना स्टाईल आंदोलन करण्यात येईल.
-रामभाऊ जाधव, जिल्हाध्यक्ष, छावा मराठा संघटना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)