मुळा, पवनेची जलपर्णी उजनीच्या मुळावर!

पिंपरी महापालिकेचा गलथान कारभार ः पाण्याच्या प्रवाहातच ढकलली जातेय जलपर्णी


-ज्ञानेश्‍वर टकले

सांगवी  -पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांची पात्रे जलपर्णीमुळे बरबटली आहेत. जलपर्णी काढण्याचे काम करण्यासाठी एकाच वेळी शंभरभर कामगारांची गरज असताना मुळा नदीपात्रात फक्त 4 ते 5 लोक जलपर्णी काढत असल्याची परिस्थिती आहे. तेही जलपर्णी पात्राबाहेर न काढता केवळ पाण्याबरोबर ढकलून लावण्याचे काम करीत आहेत. नदीपात्रांतील जलपर्णी खाली वाहून गेल्यामुळे उजनी धरण प्रदूषित होत आहे.

“नेमीच येतो पावसाळा’ या उक्तीप्रमाणे “नेमीच येते जलपर्णी’ अशी परिस्थिती असताना जलपर्णीचे समूळ उच्चाटन करण्याची मानसिकता ना महापालिका आयुक्तांमध्ये आहे, ना लोकप्रतिनिधींमध्ये. यंदाही तीच परिस्थिती आहे. सर्व स्तरातून टीका व्हायला लागल्यावर महापालिका प्रशासन जलपर्णी काढण्याचे नियोजन करते. तेही मार्च महिन्यात, जेव्हा संपूर्ण नदीपात्र जलपर्णीमुळे भरून गेलेले असते.

वस्तुतः पावसाळा संपला की ऑक्‍टोबर महिन्यात थोडी जलपर्णी असते, तेव्हाच ती नदीपात्राबाहेर काढून टाकणे गरजेचे असते. पण निविदा प्रक्रियेचे कारण देऊन चालढकल केली जाते. जलपर्णीसारख्या गंभीर विषयावर निर्णय घेण्यासाठी आयुक्तांना वेळ मिळू नये ? याबाबत नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे.

मुळात जलपर्णी तयार होण्यास कारणीभूत ठरत असलेले दूषित पाणी रोखणे आवश्‍यक आहे. त्यासाठी नदीपात्राशेजारच्या सोसायट्या, कंपन्या यांच्यावर कठोर कारवाई करून असे दूषित पाणी रोखणे शक्‍य होईल. आता ठेकेदारामार्फत जलपर्णी काढण्याचे नाटक सुरू आहे. हे नाटक पावसाळा सुरू होऊन नदीपात्रातील जलपर्णी वाहून जाईपर्यंत ते सुरू राहील. विशेष म्हणजे ही जलपर्णी नदीपात्राबाहेर न काढता ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीपात्रातच ढकलून दिली जात आहे. ही जलपर्णी पुढे जागोजागी अडकते. अडकल्याने ती कुजून नदी प्रदूषणात भर घालत आहे. पावसाळ्यात पवना, मुळा, मुठा दुथडी भरून वाहतात. नदीपात्रातील जलपर्णी पावसाळ्यात प्रवाहाबरोबर भीमेच्या पात्रात जाते. त्यामुळे भीमेसह त्यावरील उजनी धरण प्रदूषित होत आहे.

उजनी धरणातील पाण्यावर काळा तवंग येत असून, जनावरे, जलचर प्राण्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. मृत माशांचा खच उजनी नदीकाठी पाहायला मिळतो. या पाण्याचा पिकांवरही गंभीर परिणाम होत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी घेतलेल्या बोरवेलवरही या पाण्याचा परिणाम झालेला आहे. लोकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. सध्या जलपर्णी काढण्याचे काम देण्यात आलेला ठेकेदार स्वच्छतागृह साफसफाईसाठी नेमण्यात आला आहे.

या ठेकेदाराला जलपर्णी काढण्याबाबत काडीचीही माहिती नाही. आता हाच ठेकेदार चार-पाच कामगारांना हाताशी धरून जलपर्णी काढण्याचे नाही, तर जलपर्णी ढकलून लावण्याचे काम करत आहे. जलपर्णी आणि दूषित पाण्याचा मुद्दा घेऊन लोक आंदोलन करीत आहेत. परंतु, हा प्रश्‍न सुटत नाही. यासाठी पिंपरी व पुणे महापालिकेने जलपर्णीवर गंभीर होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“महापालिकेकडे जलपर्णी काढण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही. जलपर्णी ढकलून न लावता नदीपात्राबाहेर काढून टाकली तरच आयुक्तांनी ठेकेदारांची बिले काढावीत. जलपर्णी ढकलून लावण्यासाठी पैसे देऊ नयेत. नदीपात्रात ढकललेली जलपर्णी पुढे भीमा आणि पर्यायाने अनेक शहर, गावांचे पाणी प्रदूषित करीत आहे.
– राजू सावळे, उपाध्यक्ष, मनसे पर्यावरण विभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)