पिंपरी : महावितरणची वसुली मोहीम तीव्र

थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यावर जोर

शून्य थकबाकी मोहीम

पुणे परिमंडळातील थकबाकी वसूल करण्यासाठी शून्य थकबाकी मोहीम राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव व खेड तालुक्‍यात कारवाई करण्यात येत आहे. महावितरण व्यवस्थापनाने संपूर्ण थकबाकी वसूल करण्याचा निश्‍चय केला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्यात आलेल्या कारवाईत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पिंपरी – आर्थिक वर्ष संपण्यास काही तासांचा कालावधी बाकी असतानाच महावितरणच्या वतीने वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. थकबाकीदारांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले जात असून, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

महावितरणची आर्थिक स्थिती नाजूक आहे. ग्राहकांकडून मिळणाऱ्या महसुलातून वीज खरेदी, मनुष्यबळावरील वेतन आणि अन्य बाबींचा ताळमेळ घालण्यात महावितरण प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे आर्थिक वर्षच नव्हे, तर सर्वच महिन्यांत वसुली करण्यावर भर देण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून मिळत आहेत. आर्थिक वर्ष संपायला काही तासांचा अवधी बाकी आहे. मात्र, गेली महिनाभरापासून महावितरणच्या वतीने वसुलीसासठी विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये चारचाकी वाहनातील लाऊडस्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी आवाहन केले जात असून, त्याचबरोबरच वीजेचा योग्यप्रकारे वापर करण्याच्या टिप्स दिल्या जात आहेत. महसूलवाढीसाठी तर ग्रामीण भागात आठवडे बाजाराच्या दिवशी फिरते वीज बिल संकलन केंद्रात बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी या दोन्ही विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील थकबाकीदारांचा वीजपुरवठा सुट्टीच्या दिवशी देखील खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याकरिता प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांचे विशेष पथक पुणे परिमंडळातील विविध ठिकाणी भेट देऊन थकबाकीदारांविरुद्धच्या कारवाईचा अहवाल वरिष्ठांकडे सोपविणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)