आकर्षित करू लागली उन्हाळी रसदार फळे…!

आवक वाढली : द्राक्ष, कलिंगड, संत्र्याचे दर आवाक्‍यात

पिंपरी -उन्हाची तीव्रता मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. रखरखत्या उन्हाबरोबरच पिंपरी येथील भाजी मंडईत उन्हाळी फळांची आवकही मोठ्या प्रमाणात होत असून कलिंगड, द्राक्ष, संत्री याबरोबरच आंब्याची आवकही वाढली आहे. कलिंगड, द्राक्ष, संत्रा, खरबुजाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आल्याने या फळांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.

उन्हाळ्यामध्ये शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यास ताज्या फळांचा रस पिण्याचा सल्ला डॉक्‍टर देत असतात. त्यामुळे अनेक नागरिक उन्हाळ्यात फळांचा आस्वाद घेत असतात. मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील तापमानाने चाळीशी गाठली आहे. उन्हाचा तडाखा वाढत असतानाच शहरातील भाजी मंडईमध्ये फळांची आवकही मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. कलिंगड आणि खरबुजाची आवक सातत्याने वाढत आहे. कलिंगडामध्ये 3 ते 4 किलोचे शुगरक्‍वीन, 8 ते 10 किलोचे नामधारी अशी कलिंगडे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. तर आंब्यामध्ये लालबाग, बदाम, हापूस आदी आंब्याची आवक वाढली आहे. तर द्राक्षांमध्ये काळी, हिरवी व लाल द्राक्षे उपलब्ध आहेत. नागपुरी संत्रे, मोसंबी व लिंबू तसेच पेरुफळांना मोठी मागणी आहे.

मागील काही दिवसांपासून या फळांची आवक वाढली असल्याने भावांमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. यावर्षी कलिंगडाची व द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे दरामध्ये घसरण झालेली पहायला मिळत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडे बेदाणा तयार करण्यासाठी शेडनेडची सुविधा नसल्याने भाव कमी असतानाही शेतकरी आपली द्राक्षे विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे यावर्षी उन्हाच्या झळा अधिक असल्या तरी फळांचे दर कमी झाल्याने अनेक ग्राहकांकडून उन्हाच्या तीव्रतेपासून सुटका करण्यासाठी फळांच्या रसाचा आधार घेतला जात असल्याचे दिसत आहे. यामुळे उन्हाळात गारवा आणि आनंद देणारी उन्हाळी फळे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

फळांचे प्रकार व दर

कलिंगड 40 ते 60 रुपये, खरबूज (आकारानुसार) 10 ते 50 रु., द्राक्षे 40 ते 70रु., अननस 30 ते 60 रु., नागपूर संत्री 40 ते 60, बदाम आंबा 80 ते 120, हापूस आंबा 1000 ते 1200 (डझन), ड्रॅगन फ्रुट 60 ते 100 (नग), किवी 100रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)