झेंडूचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचा उडतोय रंग

संग्रहित छायाचित्र.....

सातत्याने उतरताहेत भाव : उत्पादन खर्चही निघणे अवघड

पिंपरी  – मागील काही दिवसांपासून झेंडूच्या फुलांचे भाव सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे, झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीला समोरे जावे लागत असून उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणेच झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. किलोला सरासरी 15 ते 20 रु भाव मिळत असल्याने विक्रीसाठी वाहतूकही शेतकऱ्यांना स्वखर्चाने करावी लागत आहे.

महाराष्ट्र अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकरी उपलब्ध असलेल्या पाण्यावर आपली पिके जगवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अथक परिश्रमातून जगवलेल्या पिकांना मात्र भावच नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी पाणी टंचाईचा सामना करीत झेंडू जगवला मात्र, घसरलेल्या दरामुळे झेंडूची फुले टाकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

मागील दिवाळीमध्येही झेंडूचे दर अशाच प्रकारे घसरले होते. हंगामात फुलांना दर न मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, मात्र दिवाळीनंतर झेंडूचा दरामध्ये वाढ झाली होती. झेंडूला चांगला भावही मिळू लागला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये झेंडूचे उत्पादन घेतले होते. दर मिळतील या अपेक्षेने मावळमधील अनेक गावात शेतकऱ्यांनी गुलाबाबरोबरच झेंडूची लागवड केली होती.

दरवर्षी उन्हाळ्यात फुलांना सरासरी एवढा दर मिळत असतो. लग्नसराई आणि सण आणि इतर कार्यक्रमामुळे झेंडूला मागणीही असते. यावर्षी मात्र लग्नसराई असूनही दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या पुणे, पिंपरी-चिंचवड बाजरपेठेत फुलांना प्रतिकिलो 12 ते 14 रु, मध्यम फुलांना 15 ते 20 रुपये भाव मिळत आहे. हा दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या दराने उत्पादन खर्चही निघत नसल्याने अनेकांनी फुले न तोडणेच पसंद केले आहे.

“गेल्या महिन्यापर्यंत फुलांना चांगला दर होता. मात्र, आता उन्हाळी फुलांची आवक सुरु झाल्यानंतर काही प्रमाणात दर कमी झाले आहेत. भाव नसल्याने आवकही काही प्रमाणात कमी झाली आहे. सध्याच्या भावामध्ये फुलांची विक्री शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत, त्यामुळे, फुलांची कमतरता जाणवणार आहे.
– किशोर माळी, विक्रेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)