ऑप्टीमाईज पद्धतीने वाहतूक नियंत्रण प्रणाली

ट्रॅफिक सिग्नलचे एकत्रीकरण – विद्यार्थ्याचे पेटंटसाठी प्रयत्न

पिंपरी – शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नलचे एकत्रीकरण करुन उच्च संगणक प्रणालीव्दारे नियंत्रण केल्यास शहरातील वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखता येईल. तसेच नागरिकांच्या वेळेची व इंधन बचतीतून पैशांची बचत होईल, अशी संगणक प्रणाली ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने करण वाघेरे यांनी विकसित केली आहे. या प्रणालीच्या पेटंटसाठी नोंदणी केली आहे.

ताथवडे येथील जयवंत शिक्षण प्रसारक मंडळच्या (जेएसपीएम) राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये संगणक शाखेत चौथ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या करण शंकर वाघेरे यांनी प्राचार्य डॉ.आर. के. जैन आणि प्रा. संतोष जव्हेरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संगणक प्रणाली विकसित केली आहे.

या प्रस्तावित संगणक प्रणालीमध्ये एकाच सर्व्हरसह अनेक इन्फ्रारेड सेंन्सरचा समावेश करुन ऑप्टीमाईज पध्दतीने वाहतूक नियंत्रण करता येईल. उदाहरणार्थ अनेक मार्गावर वाहने नसतानाही सिग्नल सुरुच असतो त्यामुळे विरुध्द किंवा डाव्या व उजव्या बाजूने येणाऱ्या वाहनांना थांबावे लागते. यामुळे त्या तीनही दिशांवरील वाहनांची इंजिन सुरुच राहते. यातूनच इंधनाचा व वेळेचा अपव्यय होऊन प्रदूषणात भर पडते. या संगणक प्रणालीव्दारे ज्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते, त्या दिशेचा सिग्नल हिरवा करुन त्यांना प्रथम जायला संधी दिली जाते.

सिग्नलला थांबलेल्या वाहनांची सर्व्हरमध्ये सेंन्सरव्दारे नोंद होऊन अधिक संख्येने असणाऱ्या वाहनांना प्रथम संधी दिली जाते. ज्या बाजूने वाहने नसतात तो सिग्नल लाल करुन वाहतूक नियंत्रण करता येते. सर्व्हरकडे जमा झालेल्या वाहनांच्या संख्येचे विश्‍लेषण व सिग्नलचे सर्व नियंत्रण सर्व्हरव्दारे केले जाईल. वाहनांची संख्या विचारात घेऊन सिग्नलची वेळ आवश्‍यक तेथे कमी जास्त करता येईल.

यामध्ये आवश्‍यक असेल तरच जसे की, रुग्ण वाहिका, अग्निशामक बंब, अतिमहत्वाच्या व्यक्‍ती, वेळ प्रसंगी अत्यावश्‍यक सेवेसाठी मानवी हस्तक्षेप करता येईल. या प्रणालीतून जमा होणारा डेटा सुरक्षितपणे एनक्रिप्ट करता येईल. यासाठी आयआर सेंन्सरचा वापर करण्यात आल्यामुळे एका शहरातील वाहतूक नियंत्रण करण्यासाठी कमीत कमी खर्च येईल. अशी संगणक प्रणाली प्रायोगिक तत्वावर पुणे व पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांअंतर्गत करावा यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे प्राचार्य डॉ. जैन यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)