दुष्काळग्रस्त तरुणांना ‘होम डिलिव्हरीचा’ आधार

दिलासादायक : शहरात आलेल्या शेकडो तरुणांना रोजगार


अमरसिंह भातलवंडे

पिंपरी – राज्यातील एकूण 26 जिल्ह्यामंधील सुमारे पाच हजाराहून अधिक गावांमध्ये दुष्काळ किंवा दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येने तरुण राज्याच्या दुष्काळी भागातून उद्योगनगरीत दाखल होतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येने दुष्काळग्रस्त भागातून तरुण शहरात आले आहेत. यावर्षी अल्पशिक्षित असलेल्या तरुणांना “होम डिलिव्हरी’च्या नोकऱ्यांनी मोठा दिलासा दिला आहे. ई-कॉमर्स कंपन्यांच्या विविध वस्तूंपासून ते दूध, भाज्या आणि जेवण देखील घर पोहच देण्याचे चलन शहरात खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा फायदा अनेक तरुणांना होत असून दरमहा दहा ते पंधरा रुपयांची नोकरी सहज रित्या मिळत आहे.

महाराष्ट्रासह संपूर्ण मराठवाड्यात यावर्षीही भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेती व इतर व्यवसाय देखील ठप्प पडले आहेत. यामुळे हजारो शेतकरी कुटुंबाना अर्थिक अडचणीचा समाना करावा लागत आहे. त्यामुळे, शेतकरी कुटुंबातील तरुण मुले रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घेत आहेत. सध्या या दुष्काळग्रस्त तरुणांना पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहराचा आधार असला तरी इतर शहराच्या तुलनेमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या तरुणांची संख्या अधिक आहे. शेतकरी कुटुंबातील बहुतांश मुले ही अल्पशिक्षित असल्याने शहरात जाऊन काय रोजगार करायचा? असा प्रश्‍न त्यांच्यापुढे असतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून शहरी भागात, उपनगरांमध्ये तसेच शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागांमध्ये देखील ऑनलाईन कंपन्यांनी सुरु केलेल्या “होम डिलेव्हरी’ मुळे ग्रामीण भागातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.

शहरी भागात विविध वस्तू, खाद्य पदार्थ, दूध, दही या सारख्या घरपोच सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक ऑनलाईन कंपन्यांनी आपले पाय घट्ट रावेले आहेत. त्यामुळे ऑनलाईन खरेदीची उलाढालही वाढली आहे. फूड डिलिव्हरीसाठी आलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून दहावी व बारावी उर्तीर्ण झालेल्या युवकांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. दुचाकी व स्मार्ट फोन या दोन महत्वाच्या अटी या रोजगारासाठी आवश्‍यक आहेत. फुड डिलेव्हरी देणाऱ्या या कंपन्यामुळे केटरिंग, हॉटेलिंग व्यवसायालाही चांगले दिवस आले आहेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात बहुतांश भागात ऑनलाईन पध्दतीनेच नाष्टा आणि जेवण मागवणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. कॅशबॅकच्या विविध ऑफर आणि तत्काळ सेवा यामुळे अनेक जण हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद आपल्या घरात घेण्यालाच पसंदी देत आहेत. हा व्यवसाय वाढत असल्याने कंपन्याना खाद्य पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी डिलिव्हरी बॉयची संख्याही दिवसें दिवस वाढवावी लागत आहे.

“एक महिन्यापुर्वी पुणे शहरात रोजगाराच्या शोधासाठी आल्यानंतर मित्राच्या मदतीने फुड डिलिव्हरी कंपनीमध्ये “डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मोबाईलवर संदेश आला की स्मार्ट फोनवर दिलेल्या लोकेशनवर डिलिव्हरी लवकरात लवकर पोहचवण्याचे काम आम्ही करीत आहेत. या माध्यमातून दरमहा 10 ते 15 हजार रोजगार मिळाला आहे.
– जीवन कांबळे, परंडा, जि. उस्मानाबाद

“कॅब’ने करियरला वेग

डिलिव्हरीसोबतच शहरातील नागरिकांना प्रवासासाठी कॅब सेवा पुरवणाऱ्या कंपन्याही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या कंपन्या 40 ते 50 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करु शकणाऱ्या तरुणांना कॅब व्यवसायाची चांगली संधी देत आहेत. शहराच्या रस्त्यावर मोबाईलमध्ये मॅप पाहत धावणाऱ्या बहुतेक चारचाकी या शहराबाहेरील तरुणांच्या आहेत. काही तरुणांना कॅबवर चालक म्हणून देखील नोकऱ्या मिळत आहेत. मराठवाड्यातून आलेल्या कित्येक तरुणांनी एका कारपासून व्यवसाय सुरू केला आणि आज त्याच कंपन्यांना आपल्या दोन ते तीन कार लावल्या आहेत. एकापेक्षा अधिक कार घेणारे व्यवसायिक देखील आपल्या भागातून येणाऱ्या तरुणांना चालकाची नोकरी देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)