पिंपरी महापालिका : ठेकेदारांची बिले 28 मार्चपर्यंतच स्वीकारणार

मुख्यलेखा अधिकाऱ्यांच्या विभागप्रमुखांना सूचना

पिंपरी -महापालिकेच्या विविध विकासकामांपोटी ठेकेदारांकडून सादर केली जाणारी बीले येत्या गुरुवारपर्यंतच(दि.28) स्वीकारली जाणार आहेत. बिलांची संख्या लक्षात घेता, त्यांचा निपटारा करण्यासाठी दोन दिवस राखून ठेवण्यात आले आहेत. गुरुवारपर्यंत सर्व विभागप्रमुखांना ही बिले सादर करण्याची सूचना मुख्य लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी दिली आहे. त्यानंतर आलेली बिले स्वीकारली जाणार नाहीत.

आर्थिक वर्ष 31 मार्चला संपत असून, त्याकरिता आता अवघ्या पाच दिवसांचा कालावधी बाकी आहे. मात्र, सर्वच ठेकेदारांकडून या आर्थिक वर्षाच्या अखेरीस बिले सादर करण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस मुख्य लेखा अधिकाऱ्यांकडे मोठ्या संख्येने बिले तपासणीसाठी जमा केली जातात.

2018-19च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार उपलब्ध तरतुदींचा योग्य प्रकारे विनियोग होण्यासाठी चालू आर्थिक वर्षाची सर्व महसूली व भांडवली बिले 25 मार्चपर्यंत लेखा विभागाकडे सादर करण्याच्या आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी सूचना दिल्या होत्या. ही बाब समाजताच बिलांची संख्या लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड कॉन्ट्रॅक्‍टर्स असोसिएशनने महापालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार करत, बिले सादर करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत वाढविण्याची मागणी केली होती.

दरम्यान, 31 मार्चला साप्ताहिक सुट्टी आहे. तसेच 29 आणि 30 मार्चला लेखा विभागाकडे प्राप्त झालेली बिले तपासली जाणार आहेत. त्यामुळे 31 मार्चपर्यंत बिले स्वीकारण्याची मुदत वाढविण्याची मागणी व्यवहार्य नाही. त्यामुळे 25 मार्चऐवजी 28 मार्चअखेरपर्यंत ही बिले स्वीकारण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)