पिंपरी : मार्चच्या अखेरीसच लाही-लाही; पारा 40 अंशांवर

पिंपरी  -शहराच्या कमाल तापमानात मागील महिनाभरापासूनच सातत्याने वाढ होत असून, किमान तापमानही वाढले आहे. मार्चच्या अखेरीसच पारा 40 अंशावर जाऊन पोहचला असल्याने पिंपरी-चिंचवडकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे दिवसभर वर्दळ असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यावरही दुपारच्या वेळी काहीसा शुकशुकाट जाणवू लागला आहे. मंगळवारी (दि. 26) कमाल तापमान 40 अंशांच्यावर पोहचल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे. गेले दोन दिवस 2019 मधील आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण दिवस ठरले आहेत.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच वातावरणात बदल झाल्याने शहराचे वातावरण काहीसे थंड होते. दिवसा ऊन तरी रात्रीच्या वेळी थंडी जाणवत होती; मात्र, मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढण्यास प्रारंभ झाला आहे. वेधशाळेने पुण्याचे कमाल तापमान 40.2 तर किमान 18.8 अंश सेल्सियस नोंदवले आहे तर खासगी हवामान संस्था स्कायमेट वेदरने पिंपरी-चिंचवडचे कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सियस इतके नोंदवले आहे.

कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत 3.9 अंश सेल्सियसने तर किमान तापमान 2.4 अंश सेल्सियसने अधिक आहे. मागील आठ दिवसांत सातत्याने तापमान 35 ते 38 अंश सेल्सियस दरम्यान नोंदवले होते. स्कायमेट वेदरनुसार पुढील संपूर्ण आठवडा पिंपरी-चिंचवडमध्ये कमाल तापमान 39 ते 40 अंशा दरम्यान राहण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे आता खऱ्या अर्थाने उन्हाळ्याची चाहूल नागरिकांना लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)