नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्यावर ऍट्रॉसिटीचा गुन्हा

पिंपरी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपरी  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक डब्बू आसवाणी यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसवाणी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निवडणुकीत प्रचार केला नाही म्हणून बेकायदेशीर जमाव जमवून जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तर दुसरीकडे आसवाणी यांनी देखील त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. पिंपरी येथील हॉटेल सलोनी येथे सोमवारी (दि.25) रात्री हा सारा प्रकार घडला आहे.

आसवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन राकेश सौदाई (वय-32, रा. पिंपरी), सनी राकेश सौदाई (वय-28), सुनिल मुकेश शर्मा (वय-22),अजय टाक (वय-25), तुषार दुलेकर (वय-25)गोलू पुर्ण नाव माहिती नाही (वय-25) व त्यांचे पाच ते सात साथीदार यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसवाणी यांचे मित्र राजेश कन्हैया ललवाणी यांचा त्यांना रात्री फोन आला की त्यांच्या ओळखीचे चार ते पाच जण दुकानात जबरदस्ती घुसले असून जबरदस्तीने फुकट दारु व बिअरचे बॉक्‍स नेत आहेत. ललवाणी यांचा फोन आल्यामुळे आसवाणी व त्यांचा मोठा मुलगा अमित तेथे गेले. त्यानंतर आसवाणी यांनी आरोपींना पैसे द्या आणि माल न्या, असे सांगितले असता एकाने “सनी भाईचा बर्थडे आहे, पैसे देणार नाही’ असे सांगतिले यानंतर वादाला सुरुवात झाली. यावेळी त्यांच्यात धक्‍काबुक्‍की झाली. आरोपी सचिन याने चिडून त्याच्याजवळील गावठी कट्टा आसवणी यांच्यावर उगारला. तर दुसऱ्याने लोखंडी कोयता घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र आरडा-ओरडा झाल्याने भितीने सारेजण तेथून पळून गेले. यावेळी आरोपींनी आसवाणी यांचा मुलाच्या गळ्यातील 90 हजार रुपयांची 3 तोळ्याची सोन्याची साखळी हिसकावून नेली.

तर या विरोधात सचिन राकेश सौदाई यानेही फिर्याद दिली असून त्यानुसार डब्बू उर्फ हिरानंद आसवाणी, लख्खू भोजवानी (वय-45) सलोनी हॉटेलचे मालक जीजू (पूर्ण नाव माहिती नाही), आसवानी यांचा मुलगा आशिष व अमित, सनी सुखेजा, लखन सुखेजा भरत हिरानंद आसवाणी यांच्यावर मारहाण व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे. सचिन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आसवाणी यांनी मागील निवडणुकीच्या काळात सचिन व त्यांच्या भावाने आसवाणी यांचे काम केले नाही याचा राग मनात धरून फिर्यादीशी वाद घालून जाणून-बुझून जातिवाचक शिवीगाळ केली व काचेच्या बॉटलने मारहाण केली. यावरून डब्बू आसवाणी व त्यांच्या मुलांवर मारहाण व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीसांनी अद्याप कोणाला अटक केली नसून पुढील तपास सुरू केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)