पिंपरी : भीमसृष्टीचे लोकार्पण लांबणीवर पडण्याची शक्‍यता

काम संथगतीने सुरू; निम्मे म्युरल्स बसविणे बाकी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा उद्यानात साकारल्या जाणाऱ्या भीमसृष्टीचे काम संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत 40 दिवसांत 19 पैकी नऊ म्युरल्स बसविण्यात आली आहेत. आतापर्यंत केवळ 50 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या आंबेडकर जयंतीपर्यंत (दि.14 एप्रिल) हे म्युरल्स बसविले जातील की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पिंपरी- चिंचवड दौऱ्यात महापालिका आधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. एमआयडीसी विश्रामगृह येथे 13 जानेवारीला झालेल्या या बैठकीत भीमसृष्टीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर 16 जानेवारीला अतिरिक्‍त आयुक्‍त संतोष पाटील यांच्या कार्यालयात पार पडलेल्या दुसऱ्या बैठकीला सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीत भीमसृष्टीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये स्थापत्य विषयक कामे व म्युरल्सच्या कामाची माहिती घेण्यात आली होती. तसेच हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार म्युरल्स बसविण्याच्या हालचालींना वेग आला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या भीमसृष्टीत दोन म्युरल्स बसविण्यात आली होती. 20 जानेवारीपर्यंत पहिल्या टप्प्यात एकूण आठ म्युरल्स बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. 20 फेब्रुवारीपर्यत सर्वच 19 म्युरल्स बसविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार हे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले होते. याशिवाय स्थापत्यविषयक कामाच्या निविदा प्राधान्याने मार्गी लावल्या जाणार आहेत. मात्र 24 मार्चपर्यंत यापैकी केवळ 9 म्युरल्स बसविण्यात आली आहेत. अद्यापही 10 म्युरल्स बसविण्याचे बाकी आहे.

या म्युरल्सला संरक्षण देण्याच्या दृष्टीने पुतळ्या भोवतीची सुरक्षा भिंतीची उंची वाढविण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग साकारण्यास राज्य शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिली आहे. संशोधक, इतिहासकार यांनीही या प्रसंगांवरील कलाकृतीला मंजूरी दिली आहे. शासनाच्या कला संचनालयाने दिलेल्या मान्यतेप्रमाणे मातीकाम करून फायबरचे म्युरल्स तयार केले आहेत. आता ते कांस्य धातूमध्ये घडविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व म्युरल्स पुण्यातील धायरी येथे कला संस्कार स्टुडिओमध्ये तयार केले जात आहेत. 16 फूट बाय 12 फूट आकाराचे 4 मोठे प्रमुख म्युरल्स आहेत. एका म्युरल्सचे धातूतील वजन सुमारे 3 हजार किलो आहे. तर, 7 फूट बाय 15 फूट आकाराचे 15 म्युरल्स आहेत. या आकारातील एका म्युरल्सचे वजन सुमारे बाराशे ते पंधराशे किलो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)