पिंपरी-चिंचवड : निवडणुकीसाठी पोलीस – आयुक्तालयाची यंत्रणा सज्ज

निवडणूक सेल कार्यान्वित : सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश

पिंपरी – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर ही पहिलीच निवडणूक आहे. आयुक्तालया अतंर्गत मावळ, शिरूर हे दोन लोकसभा मतदार संघ व पुणे, बारामती मतदार संघाचा काही भाग येतो त्यानुसार 365 मतदान केंद्रे ही पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणार आहेत. त्यामध्ये 35 मतदान केंद्रे सेवंदनशील आहेत. लोकसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची यंत्रणा सज्ज झाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या 15 पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरासह देहूरोड, तळेगाव, दिघी, आळंदी, चाकण परिसराचा समावेश आहे. या एकूण पोलीस ठाण्यांपैकी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेला काही भाग हा बारामती लोकसभा मतदार संघाला जोडण्यात आला आहे. तर पिंपरी ते तळेगाव हा परिसर मावळ आणि भोसरी, एमआयडीसी, दिघी, आळंदी, चाकण हा परिसर शिरूर लोकसभा मतदार संघात येतो. बारामती लोकसभा 23 एप्रिल तर शिरूर व मावळ 29 एप्रिलला मतदान होणार आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 1 हजार 671 वोटींग बुथ आहेत तर 365 मतदान केंद्रे आहेत. त्यातील 35 मतदान केंद्र संवेदनशील आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक बूथवर एक पोलीस कर्मचारी असणार आहे.
तर निवडणूक काळात भरारी पथकांची निर्मितीही करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात चार भरारी पथके असून त्यांचे नियोजन हे परिमंडळ नुसार पोलीस उपायुक्त करणार आहेत. निवडणूक काळाच्या कामकाजासाठी सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोर्टकाम आणि आजारपणा व्यतिरिक्त शक्‍यतो सुट्ट्या घेण्यात येऊ नयेत, असे स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. तर सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्तांच्या कार्यप्रकाराची देखील तात्पुरती विभागणी पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केली आहे. तसेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक सेल कार्यान्वित करण्यात आला असून 17 जण या सेलमध्ये काम करीत आहेत.

12 ठिकाणी नाकेबंदी

निवडणुकीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था रहावी, यासाठी 12 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच पोलीस ठाण्यांची भरारी पथके देखील शहरात गस्त घालत आहेत. त्यानुसार नुकतीच राज्य उत्पादन शुल्क यांनी 11 लाखांची बनावट विदेशी दारु जप्त केली तर अमली पदार्थ विरोधी पथक व खंडणी विरोधी पथकाने 36 लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली आहे.

परवाना धारकांची 511 हत्यारे पोलिसांकडे जमा

शहरात ज्यांच्याकडे नोंदणीकृत हत्यारे आहेत, त्यांची माहिती काढून हत्यारे जमा करण्याचे काम सुरू असून शहरात एकूण 1 हजार 59 हत्यार परवानाधारक आहेत. त्यातील 511 हत्यारे पोलिसांनी जमा करुन घेतली आहेत. तसेच ज्यांच्याकडे परवानगी नाही, अशांवर पोलिसांची करडी नजर आहे.

मनुष्यबळ व गाड्यांचा खो

निवडणूक काळात प्रभावीपणे कारवाई करणे व शांतता राखण्यासाठी आयुक्तालयाला कर्मचारी आणि वाहन या दोन समस्या अद्यापही भेडसावत आहेत. त्यामुळे आयुक्तांची टीम संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांना कोणत्याही स्वरूपाची मदत हवी असल्यास तत्काळ ती पोहचली पाहिजे यासाठी सर्व वरिष्ठ निरीक्षकांनी जातीने लक्ष घालावे असेही सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)