पिंपरी : देखरेखीसाठी सीसीटीव्हीची नजरही ठरतेय कमजोर

पोलिसांकडून दोन डिव्हीआर बसविण्याचा सल्ला

पिंपरी – काळानुसार जशा सगळ्या गोष्टी बदलतात तसे गुन्हेगारांच्या प्रवृत्ती व गुन्हे करण्याची पद्धत देखील बदलते. दरोडा व चोरीवर करडी नजर रहावी यासाठी प्रत्येकाने सीसीटीव्ही कॅमेरे बनवावेत अशा सुचना पोलिसांनी व्यापारी वर्गाला केल्या होत्या. त्यासाठी त्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली मात्र आरोपींनीच व्यापाऱ्यांपेक्षा जास्त बदल स्वतःमध्ये करून घेत केवळ सीसीटीव्ही नाही तर त्यांचे डीव्हीआर देखील फोडणे, चोरण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार तपासासाठी पोलिसांना चांगलीच डोकेदुखी ठरत आहे.

त्यामुळे पोलिसानी व्यापाऱ्यांना दोन डिव्हीआर बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. रहाटणी गोळीबार प्रकरणातील आरोपी हे सराईत असल्याने त्यांनी केवळ डोक्‍याला बंदूक लावून चोरी केली नाही तर पुरावे पोलिसांच्या हाती लागू नयेत यासाठी त्यांनी दुकानातील डीव्हीआर फोडून टाकला, तसेच दुकान मालक व तेथील महिला कर्मचाऱ्याचा देखील फोन फोडून टाकला. त्यामुळे दुकानात सीसीटीव्ही तर होते पण त्यांच रेकॉर्डींग उपलब्ध नव्हते. याप्रकारात त्याचा फोनही फोडल्याने सीसीटीव्ही सारी सूत्रेच व्यापाऱ्याच्या हातून नाहीसी झाली. तसा सीसीटीव्हीचे कनेक्‍शन व्यापाऱ्याच्या भावाकडे होते पण त्यात रेकॉर्डींग होणे शक्‍य नव्हते. त्यामुळे महिना होत आला तरी हे आरोपी अद्यापही मोकाटच आहेत.

असाच प्रकार गांधीनगर येथे एका सराफाच्या दुकानात घडला असता तेथेही चोरांनी डीव्हीआरवर दगड घालून तो फोडला होता. त्यामुळे पोलिसांना तेथील फुटेज मिळाले नाहीत. यावर उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी आता त्यांच्या दुकानात दोन डिव्हीआर बसावेवत किंवा डीव्हीआर हे छुप्या पद्धतीने ठेवावेत असा सल्ला दिला आहे. ही समस्या केवळ व्यापारी नाही तर एटीएम मशीन येथेही सीसीटीव्हीच्या रचनेच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. तेथेही चोरटे सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारणे, कपडा टाकणे असे प्रकार करीत आहेत. त्यामुळे हे केवळ सीसीटीव्ही असून उपयोग नाही तर त्यांची देखभाल व रेकॉर्डींग होणेही तेवढेच महत्वाचे आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार शहरात 2018 सालात 41 दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातील 20 दरोडे हे परिमंडळ एक मध्ये तर 21 दरोडे परिमंडळ दोनमध्ये घडले आहेत. त्यातील 23 व्यावसायिकांवर दरोडे पडले आहेत. तर जुलै ते मार्च या नऊ महिन्यांत सात एटीएम फोडल्याचा घटना घडल्या आहेत. यातील काही गुन्ह्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे आहेत तर काहींचे उपलब्ध नसल्याने त्यांचा तपास करणे पोलिसांना जिकीरीचे बनले आहे.

“बऱ्याचवेळा व्यापारी एखादा शोपीस सजवून ठेवावा तसा तो डीव्हीआर उघड ठेवतात ते जास्त धोकादायक आहे. चोरट्यांच्या ते सहज नजरेस पडते व गुन्हेगारही आता तरबेज झाले आहेत. त्यामुळे व्यापारी किंवा इतरांनी ही काळजी घेणे गरजेचे आहे. शक्‍य असल्यास दुकानात एक आणि दुसरा डीव्हीआर छुप्या पद्धतीने ठेवावा किंवा कोणताही डीव्हीआर नजरेस पडेल अशा पध्दतीने उघडा ठेवू नये.
– सतीश पाटील, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)