पिंपरी : हे पीएमपी स्थानक की रिक्षा स्टॅण्ड?

पीएमपी स्थानकावर प्रवाशांना मिळेना उभे राहण्यासही जागा

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य सार्वजनिक वाहतूक सेवा देणारी पीएमपीचे स्थानके सोयी सुविधेअभावी बकाल झाले आहे. पीएमपी स्थानकावर पीएमपी बसेसलाच उभे राहण्यास जागा नसून रिक्षांनी स्थानकांना गिळंकृत केले आहे. यामुळे पीएमपी स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना हे पीएमपी स्थानक की रिक्षा स्टॅन्ड असा प्रश्‍न पडत आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे 4 हजार बसथांबे आहेत. मात्र त्यापैकी 70 टक्के बसस्थानकांना शेड नसून उर्वरित स्थानकावर फुकट्या जाहिरात, शेडची फाटलेली छपरे, बसच्या वेळापत्रकांचा अभाव, बसण्यास पुरेशी जागा नाही व त्यातच रिक्षाचालकांनी स्थानकाला वेढा घातला असल्याने पीएमपीचे प्रवासी हैराण आहेत.

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पीएमपी स्थानकाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून येथे पीएमपी प्रवाशांना स्थानकावर बसायलाही जागा मिळत नाही. यामुळे प्रवाशांना उन्हात तासन्‌-तास ताटकळत उभे रहावे लागत आहे. तर, वाहतूक पोलिसांची रिक्षा चालकांवर कुठलाही वचक नसल्याने पीएमपी स्थानकाला रिक्षांनी वेढा घातला आहे. यामुळे पीएमपी स्थानकावर येणाऱ्या बसेसना रस्त्यावर उभे रहावे लागत असून बसमध्ये बसायला प्रवाशांना रिक्षांना ओलांडून जावे लागत आहे. तर, यामुळे पीएमपी बसेसला रस्त्यावर जास्तवेळ उभे राहिल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

शहरात मेट्रोचा प्रकल्प होत असल्याने आधीच रस्ते अरुंद झाले असल्याने त्यात, रिक्षांच्या अवैध पार्किंगने अडचणीत आणखीणच भर पडली आहे. याकडे पीएमपी प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक पोलीस सर्सास कानाडोळा करत आहेत. याचा फटका पीएमपीला महसूल रुपात बसत असून दिवसेंदिवस पीएमपीच्या प्रवाशांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

“पोलीस बघ्याच्या भूमिका घेत असून समोर दिसत असलेल्या रिक्षांवर कारवाई केली जात नाही. पीएमपी स्थानकावर उभे राहिल्यास रिक्षा चालक दादागिरी कारतात. रिक्षात बसायला नकार दिल्यास उलटून बोलतात व शिविगाळ करित आहेत. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
– सतेज कुलकर्णी, पीएमपी प्रवासी

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)